Many problems in the crop insurance scheme
धारूर, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी सुरू केलेली पिक विमा योजना आज शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. विमा भरण्यापासून ते नुकसानभरपाई मिळवण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पिक विमा भरण्याच्या प्रक्रियेत अनेकदा ऑनलाईन तांत्रिक अडचणी, नेटवर्कची समस्या, तसेच बँकांमधील व्यवहारातील विलंब या कारणांमुळे शेतकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. काही शेतकरी नगदी रक्कम देऊन ऑनलाईन विमा भरतात, परंतु त्याची पावती वेळेवर मिळत नाही, परिणामी नोंदणी प्रक्रियेत अडथळे येतात. अतिवृष्टी, दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाल्यास, महसूल विभागाकडून पंचनामा, ई-पिक पाहणी ऑनलाईन नोंद, पीक कापणी अहवाल, या सर्व प्रक्रिया वेळखाऊ आणि गुंतागुंतीच्या ठरतात.
या प्रक्रियेत महसूल मंडळ, कृषी विभाग आणि पिक विमा कंपनी या तीन स्वतंत्र यंत्रणांशी शेतकऱ्याला झुंज द्यावी लागते. विमा भरला असतानाही नुकसानभरपाई मिळण्यात विलंब होत असल्याने शेतकरी निराश झाले आहेत. अनेक प्रकरणांमध्ये विमा कंपनीकडून तपासणी अहवाल प्रलंबित ठेवला जातो, तर काही ठिकाणी महसूल विभागाकडून नुकसान नोंद नीट पाठवली जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा विमा रकमेपासून वंचित राहावे लागते. शेतकऱ्यांनी या त्रासदायक प्रक्रियेविरोधात आवाज उठवला असून, विमा भरण्यापासून ते नुकसानभरपाई पर्यंतची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक व्हावी, तसेच सर्व विभागांमध्ये सुसंवाद व एकत्रित समन्वय यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी केली जात आहे.
शेतकरी म्हणतात, आम्ही पिक विमा भरतो, पण त्यानंतर विमा मिळवण्यासाठी महसूल, कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या फेऱ्या मारून थकलो आहोत. विमा संरक्षण मिळवण्यासाठीच आता संघर्ष करावा लागतो. सरकारने या योजनेचा मूळ हेतू लक्षात घेऊन, शेतकऱ्यांना दिलासा देणारे तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे शेतकरी वर्गातून मत व्यक्त होत आहे.
तालुक्यामध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. सरासरी पेक्षा मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन शेतकरी आर्थिक अडचणी सापडलेला आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे व पिक विमा मंजूर करायला पाहिजे पण पिक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्याला ई पीक पाहणी ऑनलाइन करण्यासाठी अनेक अडचणी आल्या तसेच पीक कापणी अहवाल घेण्यासाठी कृषी विभाग महसूल विभाग पिक विमा कंपनी यांच्याशी संघर्ष करावा लागत आहे. पिक विमा, अनुदान सुलभ होऊन शेतकऱ्याला तात्काळ मदत व्हावी अशी अपेक्षा शेतकरी राजेश थोरात यांनी व्यक्त केली.