केज: संतोष देशमुख कुटुंबाला मुख्यमंत्र्यांनी एकही गुन्हेगार सुटणार नाही, असा शब्द दिलेला असताना सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात नाहीत. किंवा त्यांना सहआरोपी केले जात नाही, अशी खंत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी व्यक्त करून सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. (Santosh Deshmukh Murder Case)
संतोष देशमुख हत्येचा तपास हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. या मागण्यासाठी आज (दि. २५) मस्साजोग येथील ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यावेळी मनोज जरांगे, आमदार संदीप क्षीरसागर, राजेसाहेब देशमुख, रमेश आडसकर यांनी भेट दिली. यावेळी जरांगे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, जर मुख्यमंत्री या प्रकरणाचा तपास करून गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी कमी पडत असतील. तर त्यांनी देशमुख कुटुंबाच्या आंदोलनात सहभागी होऊन केंद्राकडे सखोल तपासाची मागणी करावी. जर उपोषणार्थींच्या जीविताला काही झाले, तर गाठ महाराष्ट्रातील मराठ्यांशी आहे, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणा जर गुन्हेगारांना मदत करणारे सहआरोपी झाले नाहीत. तर येत्या अधिवेशनामध्ये आम्ही याचा सरकारला जाब विचारून धारेवर धरू, तपास यंत्रणातील सर्व अधिकारी वाल्मीक कराड यांनी जिल्ह्यामध्ये आणलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यास ते धाजावत नसावेत, असा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना केला.