Manoj Jarange Patil: My murder was plotted in Parli
बीड, पुढारी वृत्तसेवा : पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका आरोपीचे रेकॉर्डिंग ऐकले, त्याच्यात एक वाक्य आहे, आम्ही परळीला गेलो, तेथे आणखी एकाला बघितले असे तो सांगतो. यावरून माझ्या हत्येचा कट परळीतच शिजला असे स्पष्ट होत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. गुरुवारी बीडमध्ये श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या वतीने मंगल कार्यालयाचा शुभारंभकरण्यात आला, त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, राजकारणामध्ये एकमेकांविर-ोधात भाषण केलं जातं, टीका केली जाते, मात्र माझ्या घातपातापर्यंत पोहचले. आता नार्को टेस्टसाठी निघायचं. कांचन नावाच्या पोराने त्यांना घरी येऊन परळीच्या रेस्ट हाऊसला नेले. या आरोपींचे एक वाक्य आहे, आम्ही परळीला गेलो असे म्हणतो, म्हणजे शंभर टक्के तिथे खुनाचा कट शिजला. दोन चार आरोपी आणि आ.धनंजय मुंडे स्वतः यांनी हा कट रचला. आता फक्त अजितदादांनी सांभाळून रहावं, आता विनाकारण दादांनी त्याला पाठबळ देऊ नये.
गरुड नावाच्या माणसाला मी खरंच बघितलं नाही, तो कोण आहे याचा मला मेळ नाही. तो म्हणतो माझ्या घरी भाकरी करायला होता, आमचा फेस पडायला लागला भाकरी थापून थापून, हे सगळ्यांना माहीत आहे. हे फार मोठे षडयंत्र आहे, या टोकाला त्यांनी जायला नको होते.
तुम्ही माझ्या मुळावर उठलात, मी एवढा सोपा नाही. आता अजित पवारांनी पांघरूण घालू नये. २०२४ मध्ये काय झाले होते माहिती आहे. कोणाच्या तोंडचं पाणी पळालं होत, कोण कोणाला पळवत होतं, हे मीडियासमोर सांगायला लावू नका. आता २०२९ मध्ये हे सगळं मी लक्षात ठेवणार आहे, मी फार खूणशी माणूस आहे. आता मी अजित दादांना तुमच्या माध्यमातून सांगतो, त्यांना लवकर चौकशीला पाठवा, अन्यथा परिणामांना सामोरे जा असा देखील इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
त्यांचा निर्णय चांगला, पण कोण ऐकत असते का ?
खा. शरद पवार यांनी ओबीसी आरक्षण असलेल्या जागेवर मूळ ओबीसी उमेदवारच उभा करणार अशी भूमिका घेतली होती. त्यावर आता जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आरक्षणाचा लाभ कोणी, कुठे आणि कसा घ्यायचा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यांचा निर्णय चांगला आहे, पण कोण ऐकत असते का? असे देखील जरांगे यांनी म्हटले आहे.
नारायणगड संस्थानचे बीडमध्ये मंगल कार्यालय
श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या वतीने तळेगाव नजीक असलेल्या जागेमध्ये मुलांसाठी हॉस्टेल सुरू केलेले आहे. याच ठिकाणी मंगल कार्यालय होणार आहे. याचे भूमिपूजन महंत शिवाजी महाराज व मनोज जरांगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल जगताप, बळीराम गवते, जे.पी. शेळके, गोवर्धन काशीद यांच्यासह नारायणगड भक्तांची उपस्थिती होती.