मनोज जरांगे पाटील pudhari photo
बीड

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा आज पाटोद्यात मुक्काम

गेवराईपासून ते वैद्यकिन्हीपर्यंत स्वागताची तयारी

पुढारी वृत्तसेवा

बीड : मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील हे आज मंगळवारी सराटी अंतरवाली येथून मुंबईकडे निघणार आहेत. त्यांचा पहिला मुक्काम पाटोदा येथे राहणार असून त्या पार्श्वभूमीवर गेवराईपासून ते वैद्यकिन्हीपर्यंत त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. तसेच सोबत असणाऱ्य आंदोलकांनाही जेवण, नाष्टा, चहा आदिंची सोय करण्यात आल्याची माहिती पाटोदा येथील समन्वयकांनी दिली.

मनोज जरांगे पाटील हे दि.२९ ऑगस्टपासून मराठा आरक्षण प्रश्नावरील विविध मागण्यांच्या संदर्भात उपोषण करत आहेत. या दरम्यान त्यांनी दि.१५ रोजी मुंबईकडे निघणार असल्याचे जाहीर केले होते. या नियोजीत दौऱ्यानुसार मंगळवारी ते अंतरवाली येथून निघून रात्री पाटोदा येथे मुक्कामी थांबणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या यापूर्वीच्या आंदोलनाला बीडमधून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. यावेळी देखील त्यांच्या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी होणार आहेत. जरांगे पाटील यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गेवराई, पाडळशिंगी, पेंडगाव, महालक्ष्मी चौक, बीड शहर, बार्शीनाका, पाली, मांजरसुंबा, लिंबागणेश व वैद्यकिन्ही या ठिकाणी स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्या दरम्यान बीडमध्ये जाहीर सभा देखील होण्याची शक्यता आहे.

मुक्कामाची तयारी पूर्ण

मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलक हे मंगळवारी पाटोद्यात मुक्कामी राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाटोदा शहर परिसरात आठ ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तसेच भोजनाची देखील पाटोदा शहरामध्ये बारा ठिकाणी सोय करण्यात आली आहे.

पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर

मनोज जरांगे पाटील हे गेवराई, बीड मार्गे पाटोदा येथे जाणार असल्याने या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता पोलिस प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. बीड जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच राज्य राखीव दलाच्या तीन प्लाटून जिल्ह्यात बंदोबस्तासाठी उपलब्ध झाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT