Manoj Jarange Patil Mumbai March pudhari
बीड

Manoj Jarange Patil : जरांगे-पाटलांच्या स्वागतासाठी गेवराईत लोटला जनसागर

१७ दिवसांच्या उपोषणानंतर मुंबईकडे कूच; क्रेनच्या साहाय्याने घातला भव्य पुष्पहार

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे सलग १७ दिवस आमरण उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी (दि. १५) मुंबईकडे कूच केली. त्यांच्या या प्रवासादरम्यान गेवराई शहरात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांचा ताफा दाखल होताच स्वागतासाठी अक्षरशः जनसागर लोटला होता. भगवे झेंडे आणि घोषणांच्या गजरामुळे संपूर्ण शहर भगवेमय झाले होते.

शहरात ठिकठिकाणी फुलांची उधळण आणि तोफांच्या सलामीने जरांगे-पाटलांचे जंगी स्वागत करण्यात आले. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रेनच्या साहाय्याने त्यांना भव्य पुष्पहार अर्पण करण्यात आला. या स्वागतासाठी केवळ शहरातूनच नव्हे तर तालुक्यातील विविध गावांमधून युवक, महिला आणि मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अभूतपूर्व गर्दीमुळे गेवराईतील वातावरणाला एका मोठ्या आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले होते. ताफ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांसाठी आणि नागरिकांसाठी स्वागतस्थळी नाश्ता व पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. एवढ्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी गेवराई पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त तैनात केला होता.

शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढणार

"मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू केलेला हा लढा कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही. समाजाने माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, त्याला तडा जाऊ देणार नाही. आरक्षणासह समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार असून समाजबांधवांनीही आपली एकजूट कायम ठेवून या संघर्षाला ताकद द्यावी," अशी साद मनोज जरांगे-पाटील यांनी यावेळी घातली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT