Mandatory helmet use is fine, but what about freeing society from gambling?
बीड, पुढारी वृत्तसेवा : बीडचे पोलिस दल अलर्ट मोडवर काम करत असल्याचे अनेक प्रकरणांतून दिसते, आता अपघातातील जिवीतहानी टाळली जावी याकरिता शहरात हेल्मेटसक्ती केली गेली आहे, ही बाबही स्वागतार्ह आहे, परंतु इतर ठिकाणी अलर्ट मोडवर असलेली ही यंत्रणा मटका बुकीवर कारवाई करण्यात मात्र उदासिन का असते? असा प्रश्न निर्माण होत आहे. एकट्या बीड शहरात शंभरहून अधिक बुकी असून तरुणाईला याचे अक्षरशः वेड लागले आहे.
पोलिस अधिक्षक नवनित कावत यांनी पदभार स्विकारल्यापासून बीड जिल्हा पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी ठोस कारवाया करण्यात आल्या आहेत. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर एमपीडीए, तडीपारसारख्या कारवाया असतील अथवा गुंडांच्या टोळ्यांवर मकोका सारखे गुन्हे असतील, दाखल केले गेले आहेत. यामुळे काही अंशी का असेना अशा प्रवृत्तींवर आळा बसला आहे.
खून, मारामाऱ्या, चोऱ्या, दरोडे अशा घटना टाळता येणे शक्य नसले तरी त्या नियंत्रणात आणण्यासाठी अथवा त्या घडल्यानंतर तत्काळ कारवाई केली जाते. तपासातही बीडची पोलिस यंत्रणा आघाडीवर असल्याचे अनेक घटनांतून दिसून येते. आता रस्त्यावरील सुरक्षेबाबतही विशेष मोहीम आखली जात आहे. प्रारंभी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. एकाच दिवसात या कर्मचाऱ्यांकडून जवळपास आघाडीवर असल्याचे अनेक घटनांतून दिसून येते.
आता रस्त्यावरील सुरक्षेबाबतही विशेष मोहीम आखली जात आहे. प्रारंभी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. एकाच दिवसात या कर्मचाऱ्यांकडून जवळपास दोन लाखांचा दंडही वसूल करण्यात आला. आता सर्वसामान्यांनाही अशाच पद्धतीने हेल्मेट वापरण्याची चांगली सवय लागावी याकरिता हेल्मेटसक्ती केली गेली आहे. यामुळे दुचाकी अपघातात गंभीर जखमी होणे अथवा मृत्यू होण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल.
पोलिस दलाकडून अशाच पद्धतीची मोहीम महामार्गावरही राबवणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने बहुतांश क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी बीडची पोलिस यंत्रणा मटका बुकीवर कारवाई करण्यास मात्र का कचरते? असा प्रश्न सर्वसामान्य बीडकरांना पडला आहे. बीड शहरात एक-दोन नव्हे तर तब्बल शंभरहन अधिक मटका बुकी चालवल्या जातात. गल्लो-गल्लीच्या तरुणांना या बुकीचा पत्ता, मटका घेणारा एजंट माहिती असतांना बीड शहरातील तीन पोलिस ठाण्यांसह ग्रामीण पोलिस ठाण्याच्या बीट अंमलदारांना हे माहीत नसावे, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
व्हॉटसअॅपवर आकडे आणि स्क्रिनशॉट
पूर्वी मटका लावलेले आकडे एका छोट्या चिठ्ठीवर लिहून दिले जायचे. यासाठी ठराविक ठिकाणी असलेल्या या मटका बुकीवरच जावे लागायचे. आता काळ बदलला तसा मटकाही ऑनलाईन झाला आहे. कोणता आकडा आला याची माहिती आता वेबसाईटवर मिळते. तर प्रत्येक वेळी मटका बुकीवर जाण्याची गरज देखील उरलेली नाही. जे आकडे लावायचे ते संबंधीत एजंटच्या व्हॉटस्अपवर पाठवायचे, पैसे फोन पे अथवा गुगल पे वर पाठवले जातात. एखाद्याचा आकडा लागलाच तर त्याला पैसे देतांना मात्र कॅश स्वरुपात दिले जातात असा हा सगळा प्रकार चालतो.