माजलगाव : शहरातील शिंदेफना नदीवरील पुलावर सोमवारी एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेटा कारने बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात बैल गंभीर जखमी झाले. क्रेटा कारचालक आणि बैलगाडी चालकही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, क्रेटा कार आणि बैलगाडीची धडक इतकी जोरदार होती की, धडकेच्या तीव्रतेमुळे बैल अक्षरशः बाजूला लावण्यात आलेल्या बॅरिकेट्सच्या पलीकडे फेकला गेला. या घटनेनंतर पुलावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातातील क्रेटा कार नांदेड येथील असल्याचे, तर बैलगाडी माजलगाव येथील असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी हलविण्याची व्यवस्था केली.
दरम्यान, या अपघातामुळे पुलावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे. भरधाव वेग, निष्काळजीपणा किंवा अन्य कोणत्या कारणामुळे हा अपघात झाला याबाबत अधिक तपशील तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. शिंदेफना नदीवरील पुलावर यापूर्वीही अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.