टाकरवन : माजलगाव तालुक्यात यंदा मान्सूनने पाठ फिरवल्याने शेतकरी वर्गासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आता आर्द्रा नक्षत्राची सुरुवात झाली असली तरी पावसाचा अद्यापही पत्ता नसल्याने बळीराजाच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. खरीप हंगामाची सर्व भिस्त आता आर्द्रा नक्षत्रावर असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
पारंपरिक पंचांगानुसार मृग नक्षत्राचे वाहन बेडूक मानले जाते. मात्र यंदा मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्याने 'मृगाचा बेडूक बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणून गेला' अशी भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे. आता आर्द्रा नक्षत्राच्या वाहनावर असलेल्या गाढवाकडूनच पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जून महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला तरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने कापूस, सोयाबीन, तूर यांसारख्या प्रमुख खरीप पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
काही शेतकऱ्यांनी धाडस करून पेरणी केली असली तरी पावसाअभावी उगवलेल्या पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक आणखी वाढली आहे. पावसाअभावी ग्रामीण भागात देव-देवतांकडे साकडे घालणे, धोंडी काढणे, सामूहिक प्रार्थना करणे अशा पारंपरिक उपक्रमांना सुरुवात झाली आहे.
आर्द्रा नक्षत्राच्या प्रारंभीच शेतकऱ्यांच्या ओठांवर एकच प्रश्न आहे- 'मृगाने साथ दिली नाही, आता आर्द्रा तरी खरीप हंगामाला जीवनदान देणार का?' येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास माजलगाव तालुक्यावर दुष्काळाचे सावट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. मान्सूनच्या उशिरामुळे शेतमजुरांच्याही हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. पेरण्या रखडल्याने मजुरीची कामे ठप्प झाली असून ग्रामीण अर्थचक्र मंदावले आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे.
जलाशय आणि विहिरींची पातळी झपाट्याने खालावत असल्याने सिंचन व्यवस्थेची चिंता वाढली आहे. हवामान विभागाकडून पुढील काही दिवसांत पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माणहोण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी जोरदार पावसाचे स्पष्ट संकेत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
कृषी केंद्रावर शुकशुकाट
पावसाच्या प्रतीक्षेमुळे कृषी केंद्रांवरील व्यवहारांनाही मोठा फटका बसला आहे. साधारणपणे जूनच्या सुरुवातीला बियाणे व खत खरेदीसाठी कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी उसळलेली असते. मात्र यंदा जून महिना संपत आला तरी पावसाअभावी शेतकरी खरेदी टाळत असल्याने कृषी सेवा केंद्रावर शुकशुकाट दिसून येत आहे. परिणामी बियाणे आणि खत विक्रीवरही प्रतिकूल परिणाम झाला आहे.
आता आर्द्रकडूनच आशा
मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्यानंतर खरीप हंगामाची सर्व आशा आर्द्रा नक्षत्रावर टिकून आहे. पुढील आठवडाभरात समाधानकारक पाऊस झाला तर पेरण्यांना वेग मिळू शकतो; अन्यथा तालुक्यातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोरील संकट आणखी गडद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.