माजलगाव : माजलगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात विनापरवाना क्लिनिक चालवून रुग्णांवर उपचार करणाऱ्या कथित बोगस डॉक्टरविरुद्ध आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत विनापरवाना औषधसाठा, प्रिस्क्रिप्शन आणि बनावट प्रमाणपत्रासह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे शहरातील इतर बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जुन्या बसस्थानकासमोर ‘प्रथमेश क्लिनिक’ हे क्लिनिक विनापरवाना सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता भगत, सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याण नेहरकर आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांच्या पथकाने क्लिनिकवर छापा टाकला.
तपासणीदरम्यान क्लिनिकमध्ये विनापरवाना औषधांचा साठा, प्रिस्क्रिप्शन तसेच तपासणी शिबिराचे पॅम्पलेट आढळून आले. पॅम्पलेटवर संतोष सटवाजी गायकवाड यांच्या नावापुढे बी.ए.एम.एस. (ए.एम.) अशी नोंद होती. पथकाने संबंधित प्रमाणपत्राची पडताळणी केली असता ते महाराष्ट्र वैद्यकीय कायद्यांतर्गत नोंदणीकृत नसल्याचे आढळून आले.
याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता भगत यांच्या फिर्यादीवरून संतोष सटवाजी गायकवाड याच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम १८६१ तसेच औषधे व प्रसाधने कायदा १९४० मधील कलम १८ (सी) व १८ (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय डोने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याण नेहरकर करीत आहेत.
कठोर कारवाई केली जाईल- विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर आरोग्य विभागाची करडी नजर आहे. नागरिकांनी उपचार घेताना संबंधित डॉक्टरची वैद्यकीय नोंदणी तपासावी. अनधिकृतपणे क्लिनिक चालवून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची माहिती मिळाल्यास प्रशासनाला कळवावे. अशा प्रकारांवर यापुढेही नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल.”वैद्यकीय अधीक्षक , आरोग्य विभाग