बीड : माजलगाव येथील भीषण अपघात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झालेला दक्ष मेंडके हा गाडी चालवत नव्हता, तर अपघाताच्या वेळी अनुज नाईकनवरे गाडी चालवत होता, असा दावा भाजपचे नगरसेवक आणि दक्षचे वडील दीपक मेंडके यांनी केला आहे. या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी गाडीतील व्हिडिओही पुराव्यादाखल सादर केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील वाहनचालक कोण, याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
माजलगाव शहरातील गढी रोडवर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात प्रल्हाद गायकवाड व सुनीता गायकवाड या पती-पत्नीला आपले प्राण गमवावे लागले होते. या प्रकरणात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ट्विस्ट आले आहे. भाजपा नगरसेवक दीपक मेंडके यांनी सांगितले की, अपघात झाला त्यावेळी अनुराग नाईकनवरे गाडी चालवत होता, तर माझा मुलगा दक्ष शेजारच्या सीटवर बसला होता. असे असतानाही अनुराग याच्यावर गुन्हा दाखल न करता माझ्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अनुराग नाईकनवरे याने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन जबाब दिला असून, अपघातावेळी गाडी आपण चालवत असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भातील व्हिडिओही पोलिसांना दिला आहे.मी आणि माझी पत्नी दोघेही नगरसेवक आहोत. त्यामुळे राजकीय द्वेषातून मला आणि माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही मेंडके यांनी केला. हा रेसिंगचा प्रकार नसून, राजकीय बदनामी करण्यासाठी रचलेले षडयंत्र असल्याचा दावाही त्यांनी केला. पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्व पुरावे तपासून सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणाबाबत माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अपघातासंदर्भात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पंचनामा, संबंधितांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. प्रत्यक्षात वाहन कोण चालवत होते, याबाबतही काही बाबी समोर येत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व बाजूंनी तपास केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ढोणे यांनी सांगितले.
आता दीपक मेंडके यांनी सादर केलेला व्हिडिओ, अनुज नाईकनवरे याचा जबाब आणि पोलिसांचा तपास यामधून अपघातावेळी वाहन नेमके कोण चालवत होते, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गाडीमध्ये मुलांची हुल्लडबाजी : वेग १३५ वर
दरम्यान माजलगाव अपघात प्रकरणातील गाडीमधील व्हिडिओ समोर आला असून यामध्ये गाडी चालवणारा व इतर मुले कुलर बाजी करत असल्याचे दिसते. तर गाडीचा वेग देखील 135 असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. माजलगाव ते गढी रोड हा दुपदरी असून अगदी माजलगाव शहराच्या जवळच हा अपघात घडल्याने यामध्ये गाडी चालवणाराचा बेदरकारपणा देखील दिसतो.