

जाफराबाद : तालुक्यातील सातेफळ येथील अंतर्गत गल्लीतील नळ पाणीपुरवठा गेल्या आठ महिन्यांपासून बंद असल्याने परिसरातील ५० कुटुंबांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून, वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सातेफळ येथील लक्ष्मण बनकर यांच्या घरापासून अनंता बनकर यांच्या घरापर्यंतच्या अंतर्गत गल्लीत असलेली नळ पाणीपुरवठ्याची पाइपलाइन मागील आठ महिन्यांपासून बंद आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप प्रश्न मार्गी लागलेला नाही. प्रत्येक वेळी केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अखेर संतप्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून संबंधित गल्लीतील नळ पाणीपुरवठा आठ दिवसांच्या आत सुरळीत करण्याची मागणी केली आहे. नसता आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर प्रभू रंगनाथ बनकर, गंगाबाई बनकर, लक्ष्मीबाई बनकर, शोभाबाई बनकर, वंदनाबाई बनकर, आनंदाबाई बनकर, विमलबाई बनकर, मीनाबाई बनकर, इंदूबाई बनकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.