Beed Politic 
बीड

Beed Politic | शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकार तयार आमदार सुरेश धस

Beed Politic | आष्टी तालुक्यातील अंभोरा येथे सोमवारी (दि. 17) तब्बल 6 कोटी 74 लाख रुपयांच्या चार रस्ते विकास कामांचा आमदार सुरेश धस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

आष्टी प्रतिनिधी – प्रेम पवळ : आष्टी तालुक्यातील अंभोरा येथे सोमवारी (दि. 17) तब्बल 6 कोटी 74 लाख रुपयांच्या चार रस्ते विकास कामांचा आमदार सुरेश धस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांसह विविध मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. विविध विकास कामांचे उद्घाटन करताना आमदार धस यांनी ग्रामीण भागात उभ्या असलेल्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पूर्णपणे तयार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.

व्यासपीठावर माजी आमदार साहेबराव दरेकर, सुखदेव खकाळ, सरपंच सागर आमले, माजी सभापती अंकुश चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष रमेश गावडे, अनिल ढोबळे, अशोक इथापे, संजय ढोबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना आमदार धस म्हणाले की, “रस्ते हा दर्जेदार झाले पाहिजेत, ही सर्वांची मागणी आहे. अंभोरा परिसरातील रस्ता दर्जेदार कामांसह पूर्ण केला जाईल, याची मी सर्वांना ग्वाही देतो.”

त्यांनी सांगितले की वाघळुज ते अंभोरा या रस्त्याचे काम पावसामुळे काही काळ थांबले होते, मात्र ते काम आता पुन्हा गतीने सुरू होत आहे. अंभोरा येथे नवीन पोलिस ठाणे आणि पोलिस वसाहत उभारण्याचा प्रस्ताव सध्या मंत्रालयात आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच या दोन्ही प्रकल्पांचे काम सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार साहेबराव दरेकर म्हणाले की, रस्ता कामे चांगली व्हावीत यासाठी फक्त गुत्तेदार अवलंबून न राहता गावकऱ्यांनीही लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. विकासकामांसाठी गावात गटतट विसरून एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. सरपंच सागर आमले यांनीही अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम अखेर मार्गी लावल्याबद्दल आमदार धस यांचे आभार मानले आणि “काम दर्जेदार करण्यात यावे” अशी मागणी व्यक्त केली. कार्यक्रमाची प्रस्तावना शाखा अभियंता सुनील राठोड यांनी केली.

अंभोरा ग्रामपंचायतीची ‘पहिली वेबसाईट’

कार्यक्रमात आणखी एक महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला. अंभोरा ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार ऑनलाईन करण्यासाठी सरपंच सागर आमले यांनी पुढाकार घेतला असून गावाची स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटचा शुभारंभही आमदार धस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार देशात, जगात कुठूनही पाहता येणार असून ग्रामीण भागात डिजिटल प्रगतीचे हे उदाहरण ठरणार आहे.

बिहारमध्ये चांगले काम केल्यामुळे मिळाले यश – आमदार धस

आपल्या भाषणात आमदार धस यांनी बिहार राज्यातील अलीकडील निवडणूक निकालांचा उल्लेख केला.
ते म्हणाले, “विरोधकांच्या सभांना गर्दी होती, पण काम होत नसल्यामुळे मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. चांगले काम केले की जनता योग्य प्रतिसाद देते.”
अशा प्रकारे त्यांनी स्थानिक नागरिकांनाही विकासाच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन केले.

शुभारंभ झालेली रस्ते कामे करण्यात आला :

  1. राष्ट्रीय महामार्ग 561 ते नांदूर – 70 लाख रुपये

  2. राष्ट्रीय महामार्ग 561 ते अंभोरा–हिवरा – 54 लाख रुपये

  3. प्रमुख जिल्हा मार्ग 1 ते पारोडी–बोरोडी – 3 कोटी 50 लाख रुपये

  4. लोणी ते खुंटेफळ–वाटेफळ – 1 कोटी रुपये

या रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांचा, शेतकऱ्यांचा आणि दैनंदिन व्यवहार करणाऱ्या नागरिकांचा प्रवास मोठ्या प्रमाणात सुकर होणार आहे. ग्रामीण संपर्क वाढणार असल्याने रेल्वे, बाजारपेठ आणि शाळा-कॉलेजकडे जाणे सोपे होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT