Beed Shepherds Migrate Fodder-Water 
बीड

Beed Shepherds Migrate Fodder-Water|'आमचे हाल मायबाप सरकारला समजणार का?' चारा-पाण्याच्या शोधात मेंढपाळांचे जथ्थे गोदाकाठी

चारा-पाण्याच्या शोधात मेंढपाळांचे जथ्थे गोदाकाठी दाखल 'आमचे हाल मायबाप सरकारला समजणार का?' मेंढपाळांचा आर्त सवाल

पुढारी वृत्तसेवा

शिवनाथ जाधव

टाकरवन : अनेक भागांत उद्भवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील पशुधन धोक्यात आले आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने शेकडो मेंढपाळ आपल्या कुटुंबासह आणि हजारो मेंढ्यांच्या कळपासह पोटाची खळगी भरण्यासाठी गोदावरी नदीकाठच्या परिसरात दाखल झाले आहेत. ऊन-वाऱ्याची तमा न बाळगता गावोगावी भटकंती करणाऱ्या या मेंढपाळांनी शासनाच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, "आमचे हे हाल मायबाप सरकारला कधी समजणार?" असा आर्त सवाल उपस्थित केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने मराठवाडा आणि परिसरातील अनेक तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. डोंगरदऱ्यांतील गवत पूर्णपणे करपून गेले असून शेतातील पिकेही वाळली आहेत. परिणामी, मेंढ्यांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने मेंढपाळांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. आपल्या लहान मुलाबाळांसह आणि संसारोपयोगी साहित्यासह हे मेंढपाळ मैलोनमैल पायपीट करत गोदाकाठच्या हिरवळीच्या आशेने येथे पोहोचले आहेत.

सध्या गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये मेंढपाळांचे तांडे विसावलेले दिसत आहेत. मात्र, वाढत्या उन्हामुळे आणि परिसरात आधीच असलेल्या पशुधनामुळे येथेही चाऱ्याची उपलब्धता मर्यादित आहे. त्यातच रात्रीच्या वेळी उघड्यावर राहताना वन्यप्राण्यांची भीती, आरोग्याच्या समस्या आणि मुलांच्या शिक्षणाचा खोळंबा अशा अनेक संकटांचा सामना या समाजाला करावा लागत आहे.

सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, मात्र रानावनात भटकंती करणाऱ्या मेंढपाळ समाजाकडे कोणीही लक्ष देत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.

शासनाने तातडीने मेंढपाळांसाठी चारा छावण्यांची सोय करावी आणि भटकंती करणाऱ्या कुटुंबांना आर्थिक व वैद्यकीय मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मायबाप सरकार या कष्टकरी मेंढपाळांच्या व्यथांची दखल घेऊन त्यांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT