Lumpy Disease : लंपीच्या प्रादुर्भावाने बीड जिल्ह्यातील पशुपालकांचे संसार उध्वस्त File Photo
बीड

Lumpy Disease : लंपीच्या प्रादुर्भावाने बीड जिल्ह्यातील पशुपालकांचे संसार उध्वस्त

खा. बजरंग सोनवणे यांची तातडीने उपाययोजना व नुकसानभरपाईची ठोस मागणी

पुढारी वृत्तसेवा

Lumpy outbreak destroys the lives of livestock farmers in Beed district

बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून शेतकरी आणि पशुपालकांची चिंता दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. जिल्ह्यात तब्बल ९०० जनावरे बाधित झाली असून यापैकी ५८ जनावरांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांचे संसार अक्षरशः उद्धस्त झाले आहेत. वाढता मृत्युंजाळ, घटलेले दूध उत्पादन आणि जनावरांच्या उपचारांचा वाढता खर्च या तिहेरी संकटामुळे शेती व पशुपालन धोक्यात आलेले असताना, खा. बजरंग सोनवणे यांनी मात्र या गंभीर परिस्थितीकडे वेळेत लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांकडे ठोस मागण्यांचे पत्र देऊन शेतकरी पुत्राचा जागरूकपणा दाखवून दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात खा. सोनवणेंनी जिल्ह्यातील परिस्थितीचे सविस्तर चित्रण केले आहे. यात जिल्ह्यामध्ये ९०० बाधित जनावरे, ५८ मृत्यू, ६३४ बरी झालेली जनावरे, ३,४१,१३५ जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असून पशु संवर्धन विभागाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यात दूध उत्पादनात मोठी घट, तसेच काही भागांत दुधाचे सेवन टाळण्याच्या सूचना दिल्याने दुग्धव्यवसायिकांवरही आर्थिक फटका बसत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. खा. सोनवणे यांनी प्रमुख मागण्या केल्या असून यात बाधित भागांत पशुवैद्यकीय पथकांची संख्या वाढवावी, लसीकरण पूर्ण करण्यासाठी मोहिमेला गती द्यावी, मृत जनावरांच्या मालकांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, दुग्धसंघ आणि डेअरी केंद्रांसाठी तात्पुरती मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, जिल्हा प्रशासनाला आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा अशा आहेत आपल्या हस्तक्षेपामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी मुख्यमंत्र्यांना व्यक्त केला आहे.

लंपीमुळे शेतकरी अक्षरशः होरपळत आहेत. जनावरांचा जीव जातोय, दूध उत्पादन घटतंय आणि खर्च मात्र वाढतोय, अशा वेळी सरकारने तातडीने मदत न देणं म्हणजे अन्यायच. बीड जिल्ह्यातील प्रत्येक पशुपालकाच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे. त्वरित नुकसानभरपाई, १००% लसीकरण आणि उपचार पथके वाढवणे हा विलंब न करता घेतला जाणारा निर्णय असायला हवा असे खा. बजरंग सोनवणे यांनी सांगितले.

बीड तालुक्यातील एका पशुपालकाने आपल्या वेदना व्यक्त करताना सांगितले लंपीने माझी दोन जनावरे गेली. आणखी चार आजारी आहेत. दररोज औषधांचा, डॉक्टरांचा खर्च वाढतोय. घर चालवायला पैसे उरत नाहीत. सरकारनं आमच्याकडे बघितलं नाही तर आम्ही जगायचं कसं?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT