Beed news
नेकनूर : बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील डवरवाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरीची घटना घडली. विलास बुवाजी जाधव यांच्या राहत्या घरातून सुमारे ३ लाख रुपये रोख, १५ तोळे सोने, २० तोळे चांदी असा एकूण सुमारे १५ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे रिंकु अमोल जाधव यांनी सांगितले.
मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर तत्काळ नेकनूर पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिस कर्मचारी नवनाथ मुंढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व प्राथमिक चौकशी केली. चोरीप्रकरणी सकाळी तक्रार देण्यासाठी संबंधितांना नेकनूर पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले.
वाढत्या चोरीच्या घटनांमुळे लिंबागणेश परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच दुष्काळाच्या संकटाला सामोरे जात असलेल्या ग्रामस्थांमध्ये चोरीच्या घटनांमुळे चिंतेत आणखी भर पडली आहे.
नापिकीच्या विवंचनेतून अतितणाव ; माजी सरपंचांनी उचलले थेट टोकाचे पाऊल!
दुष्काळी परिस्थिती आणि सततच्या नापिकीमुळे अतीतणावातून दादाहारी वडगाव येथील माजी सरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे माजी परळी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे (वय ६०) यांनी जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. २५ सप्टेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
शिवाजीराव शिंदे हे दादाहारी वडगाव येथील राहत्या घरी असताना त्यांनी खोलीतील पंख्याला लुंगीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. शनिवारी उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दादाहारी वडगाव येथील सार्वजनिक स्मशानभूमीत शिवाजीराव शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजीराव शिंदे यांच्या पश्चात एक भाऊ, आठ बहिणी, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने दादाहारी वडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.