शिरूर : शिरूर तालुक्यातील फुलसांगवी शिवारामध्ये बिबट्या आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिल्यानंतर वनअधिकारी पाहणी करताना. pudhari photo
बीड

leopard attack Shiroor Kasar : अश्वभक्षक बिबट्याची दहशत दुसऱ्या दिवशीही कायम !

फुलसांगवी शिवारात दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याचा शेतमजुराचा दावा

पुढारी वृत्तसेवा

शिरूर : शिरूर कासार तालुक्यातील फुलसांगवी शिवारात बिबट्याने मेंढपाळाच्या घोड्यावर हल्ला करून त्याचा प्राण घेतल्याची घटना ताजी असतानाच, परिसरातील दहशत आणखी गडद झाली आहे. सोमवारी सकाळी शेतात काम करत असताना दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याचा दावा एका शेतमजुराने केल्याने फुलसांगवी व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शनिवारी मध्यरात्री फुलसांगवी शिवारात बिबट्याने मेंढपाळाच्या घोड्यावर हल्ला करून त्याचे मांस भक्ष केल्याची घटना घडली. या घटनेनंतर दोन दिवसांपासून संपूर्ण परिसर दहशतीखाली आहे. ही घटना विस्मरणात जाण्याआधीच सोमवारी सकाळी श्रीरंग लोणके हे शेतमजूर नामदेव दिनकर खेडकर यांच्या शेतात दारे धरत असताना दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याचा दावा त्यांनी केला.

या घटनेची चर्चा वाऱ्यासारखी पसरताच शेतकऱ्यांमध्ये भीतीने घर केले आहे.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बीड विभागीय वन अधिकारी अमोल गर्कळ यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने कथित बिबट्याच्या वावराच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची गस्त वाढवली आहे. शेतमजुराच्या सांगण्यानुसार ज्या उसाच्या फडामध्ये बिबट्याचा वावर असल्याची शक्यता आहे, त्या परिसरात तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

या मोहिमेत मानद वन्यजीव रक्षक सिद्धार्थ सोनवणे (बीड), वनरक्षक दादासाहेब जोशी, वनमजूर सोपान येवले, सतीश गर्जे, लवांडे तसेच वन्यप्राणी मित्र युवराज पाटील सहभागी आहेत. शेतमजुराने पाहिलेल्या बिबट्याच्या दाव्याची सत्यता पडताळणीसाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिरूर कासार तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाचे अधिकारी मान्य करतात. मात्र, ज्या ठिकाणी घोड्यावर हल्ला झाला, त्या ठिकाणी बिबट्याचे अस्तित्व असल्याचा अधिकृत दुजोरा देण्यास वनविभाग सध्या टाळाटाळ करत आहे.

घोड्यावर झालेला हल्ला बिबट्याचाच असण्याची शक्यता नाकारली जात नसली, तरी खात्रीशीर निष्कर्षासाठी ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद होणे किंवा मृत घोड्याच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे परिसरात दहशत असली तरी बिबट्याच्या वावराबाबत अधिकृत घोषणेसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून शिरूर कासार तालुक्यात विविध ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, ज्या-ज्या ठिकाणी असे दावे करण्यात आले, त्या ठिकाणी वनविभागाला अधिकृतरीत्या बिबट्या आढळलेला नाही. सोशल मीडियावरून व तोंडी चर्चेतून अफवा पसरवल्या जात असल्याने वनविभागाला वारंवार घटनास्थळी धाव घ्यावी लागत आहे. प्रत्यक्षात बिबट्या न आढळल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांची दमछाक होत असून, या अफवांमुळे मात्र शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भयभीत न होता सतर्क राहण्याचे आवाहन

फुलसांगवी परिसरात बिबट्यासदृश हिंस्र प्राण्याने घोड्यावर हल्ला केल्याची घटना गंभीर असली, तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. शक्यतो रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे, एकटे न जाता समूहाने काम करावे व कोणताही संशयास्पद प्रकार दिसल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे असे वन्यजीव रक्षक सिध्दार्थ सोनवणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT