परळी वैजनाथ : परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आर्थिक व्यवहाराच्या वादातून झालेल्या खुनप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान खून करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी फिरोजखान खैरातीखान पठाण (रा. सरदारनगर, परळी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 238 आणि 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव अफजलखान उर्फ तोहिद केरातीखान पठाण (वय 36, रा. सरदारनगर, परळी) असे आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, दोन आरोपींनी संगनमत करून आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून अफजलखान याचा खून केल्याचा आरोप आहे. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह परळीजवळील लेंडेवाडी शिवारातून जाणाऱ्या रेल्वे रुळावर फेकून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना 31 मे रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ते 1 जून दरम्यान घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी 3 जून रोजी रात्री 9.13 वाजता ऋषिकेश परमेश्वर फड (रा. वरवटी, ता. अंबाजोगाई ,ह. मु. सोमेश्वर नगर परळी) आणि गौरव दीपक व्यास (रा. स्नेहनगर, परळी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. आरोपींच्या हालचाली व घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलीसांकडून करण्यात येत आहे.
एक जून रोजी रेल्वे मार्गावर आढळला होता मृतदेह.....
परळी ते घाटनांदूर रेल्वे ट्रॅकवर लेंडेवाडी ता. परळी वैजनाथ शिवारात दि. १ जून २०२६ रोजी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी आवाहनही केले होते. त्यानंतर या मृतदेहाची ओळख पटली. मृत युवक हा परळी येथील सरदार नगर भागातील रहिवासी असल्याचे परळी ग्रामीण पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाले. मृतदेहाची ओळख पटल्यापासून हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मृत युवकाच्या नातेवाईकांनी व्यक्त केला.
या प्रकरणी दोन जनाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल
या दरम्यान सोशल मीडियावर फोन कॉल संभाषणाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये "आम्ही मारून टाकले" "आम्ही स्वतःहून पोलिसात अटक करून घेणार आहोत " अशा पद्धतीचा संवाद आढळून येतो. यामुळे या प्रकरणाच्या चर्चेला मोठे उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर आता याप्रकरणी दोन जनाविरुद्ध खूनाचा गुन्हा झाला आहे. या गंभीर प्रकरणाचा पोलीस सर्व बाजूनी तपास करत आहेत.