बीड ःस्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) जिल्ह्यात अवैध गुटखा व्यवसायाविरोधात विशेष मोहीम राबवत एकाच दिवशी तीन ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत गुटखा साठवणूक, विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून गुटखा व वाहनांसह एकूण 12 लाख 13 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एलसीबीने तीन स्वतंत्र पथके तयार करून बीड शहर, युसूफ वडगाव आणि सिरसाळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई केली. बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानकासमोर एक इसम अवैध गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत त्याच्या ताब्यातून 2 लाख 21 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाकडून स्वीफ्ट कारमधून अवैध गुटख्याची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून गुटखा व कारसह 4 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तर सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे पोहनेर येथे एका इसमाकडून ऑटोरिक्षामधून गुटखा विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत 5 लाख 42 हजार 800 रुपयांचा गुटखा व वाहन जप्त करण्यात आले. या तिन्ही कारवायांमध्ये एकूण 12 लाख 13 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.