Large-scale recruitment of teachers for SIR campaign Teaching system disrupted
परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : राज्यभर सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेसाठी शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्यात आल्याने परळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील अध्यापन व्यवस्था विस्कळीत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तालुक्यातील एकूण ६२३ जिल्हा परिषद शिक्षकांपैकी तब्बल ५५० शिक्षकांना बीएलओ (Booth Level Officer) म्हणून मतदार नोंदणी व पुनरीक्षणाच्या कामावर नियुक्त करण्यात आले आहे. परिणामी, केवळ ७३ शिक्षकांवरच विद्यार्थ्यांच्या अध्यापनाची जबाबदारी येऊन पडली आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह १६ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, त्याची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत ही मोहीम राबवली जात असून ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत काम पूर्ण करण्याचे निर्देश आहेत.
यासाठी मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषद शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी बीएलओंना सहाय्यक म्हणूनही शिक्षकांची नेमणूक करण्यात आल्याने शाळांमधील अध्यापनावर विपरीत
परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, परळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या केवळ ७३ शिक्षक अध्यापन करत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत शासन व प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
पर्यायी यंत्रणा उभारण्याची मागणी
शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाने अध्यापनाला प्राधान्य देत अशैक्षणिक कामांसाठी पर्यायी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी केली आहे. शाळांमधील शिक्षण सुरळीत ठेवत मतदार पुनरिक्षण चे राष्ट्रीय कामही प्रभावीपणे पार पडेल, असे सूक्ष्म नियोजन करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अनेक शाळा शिक्षकाविना
परळी तालुक्यातील मतदान केंद्रांच्या संख्येनुसार काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी दोन शिक्षकांना पुनरीक्षणाच्या कामावर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये ५० ते ९० टक्क्यांपर्यंत शिक्षक वर्गाबाहेर असून काही शाळांमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच शिक्षक शिल्लक राहिले आहेत. काही शाळा तर विनाशिक्षक झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान
शिक्षकांना मतदार नोंदणी, SIR सर्वेक्षण आणि इतर अशैक्षणिक कामांमध्ये गुंतविल्यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन विस्कळीत झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची चिंता पालक व शिक्षणप्रेमींनी व्यक्त केली आहे.