गौतम बचुटे, केज
एका शासकीय अधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करून खळबळ उडवून देणाऱ्या एका महिलेने पोलीस ठाण्यात नाट्यमयरित्या माघार घेतली आहे. 'असा कोणताही प्रकार घडलाच नाही,' असा जबाब तिने दिल्याने हे प्रकरण आता एका वेगळ्याच वळणावर पोहोचले आहे. या अनपेक्षित ‘यू-टर्न’मुळे केज तालुक्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले असून, या प्रकरणामागे नेमके काय दडले आहे, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, केज पंचायत समितीच्या एका विभागातील प्रभारी अधिकाऱ्याने तात्पुरत्या स्वरूपाच्या कामासाठी बोलावल्यानंतर शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला होता. सुमारे चार महिन्यांपूर्वी हा प्रकार घडल्याचे सांगत तिने काही दिवसांपूर्वी केज पोलीस ठाण्यात एक निवेदन दिले होते. यानंतर तिने जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही धाव घेत या प्रकरणात त्यांनाही सहआरोपी करण्याची मागणी केल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते.
या निवेदनाची दखल घेत पोलीस निरीक्षक स्वप्नील उनावणे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर पाळत ठेवली आणि अधिक चौकशीसाठी त्या महिलेला तिच्या एका महिला नातेवाईकासह पोलीस ठाण्यात बोलावले.
मात्र, येथेच या प्रकरणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर जबाब देताना महिलेने आपल्या पूर्वीच्या आरोपांवरून पूर्णपणे 'यू-टर्न' घेतला. आपल्यासोबत कोणताही गैरप्रकार झाला नाही आणि आपली कोणतीही तक्रार नाही, असे तिने स्पष्टपणे सांगितले.
या नाट्यमय घडामोडीनंतर केज तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. अचानक माघार घेण्यामागे महिलेवर कोणाचा दबाव होता का? की केवळ अधिकाऱ्याला बदनाम करण्याच्या उद्देशाने रचलेला हा कट होता? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्रभारी अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या एखाद्या गटाने हे प्रकरण घडवून आणले असावे, अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. या प्रकरणामुळे मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रतिमा मलीन होत असून, एका गंभीर विषयाचे गांभीर्यही कमी होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सध्या महिलेनेच आरोपातून माघार घेतल्याने पोलिसांपुढील तपासाचे आव्हान वाढले आहे. या प्रकरणामागे नेमके काय दडले आहे, हे सत्य समोर येईल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे एका संवेदनशील विषयाचा वापर वैयक्तिक किंवा राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे का, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.