Beed electric shock accident pudhari photo
बीड

Beed electric shock accident : मंदिरात विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

केज : श्रावण महिन्यात देवाला गोदावरीच्या पाण्याने जलाभिषेक करण्यासाठी मंदिरात गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणाचा विजेचा तीव्र धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे घडली आहे. युवराज आसाराम चौरे असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे जिवाचीवाडी परिसरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २८ ऑगस्ट) पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जिवाचीवाडी येथील नारद स्वामी मंदिरात श्रावण महिन्यात दररोज गावातील एका व्यक्तीने गोदावरी नदीचे पाणी आणून देवाला अर्पण करण्याची जुनी परंपरा आहे. या परंपरेनुसार युवराज चौरे हे गुरुवारी रात्री स्वतः दुचाकीवरून माजलगाव तालुक्यातील मोगरा शिवारात जाऊन गोदावरीचे पाणी घेऊन आले होते.

शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ते ओल्या कपड्यांनी भक्तीभावाने नारद स्वामींच्या मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी गेले.मात्र, मंदिराच्या गाभाऱ्याजवळ जमिनीवर पडलेल्या उघड्या वीजवाहक वायरवर त्यांचा पाय पडल्याने त्यांना विजेचा तीव्र झटका बसून ते जागीच कोसळले. घटनेनंतर कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्यांना तातडीने धारूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत घोषित केले. धारूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी १२:३० वाजता जिवाचीवाडी येथील काळअंबा वस्ती येथील शेतात शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयत युवराज यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. ऐन तारुण्यात घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT