गौतम बचुटे/केज : केज शहरात एका कॉफी कॅफे मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दि. २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास केज शहरातून एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अज्ञात कारणासाठी मुलीचे अपहरण करून तिच्यावर एका कॅफे नावाच्या एका कॉफी शॉपमध्ये लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी ॲट्रॉसीटीसह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे केज शहरात खळबळ उडाली आहे.
केज शहरात सुरू असलेल्या या घटनेनंतर नागरिकांनी कॉफी शॉपच्या नावाखाली चालणाऱ्या गैरप्रकारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक कॅफे आणि कॉफी शॉपमध्ये “प्रायव्हसी” या नावाखाली तरुण–तरुणींना पूर्ण एकांत दिला जातो.
काही ठिकाणी बंद केबिन, अंधुक प्रकाश, सीसीटीव्ही नसलेली खोली आणि बाहेरून दिसणार नाही अशी रचना ठेवली जाते. या ठिकाणी धूम्रपान, व्हेपिंग आणि इतर बेकायदेशीर वर्तन वाढल्याचीही तक्रार आहे. त्यामुळे अशा ‘गोंडस नावाखाली’ चालणाऱ्या कॅफेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.