Kannapur Deshmukh murder case 9 accused granted bail
अंबाजोगाई : कान्नापूर येथील गाजलेल्या देशमुख खून प्रकरणातील एकूण ९ आरोपींना केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने नियमित आणि अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्या वतीने अॅड. अशोक कवडे यांनी बाजू मांडली.
कान्नापूर येथील स्वप्नील उर्फ बबल्या देशमुख यांचा ३० मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता शेतात जुन्या वादातून खून करण्यात आला होता. आरोपींनी त्यांच्या डोक्यात कापूस काढण्याच्या चिमट्याने व दगडाने वार करून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रामकिसन आत्माराम देशमुख यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, संतोष अशोक देशमुख व इतर १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी संतोष अशोक देशमुख व इतर ४ आरोपींना अटक केली होती. तपासानंतर जिल्हा व सत्र न्यायालय, केज येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आरोपी रामभाऊ देशमुख, सोनाली देशमुख, श्याम देशमुख, अनिल वारकरी यांनी नियमित जामीन, तर इतर ५ आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाल्यानंतर, न्यायमूर्ती भाजीपाले यांनी २३ जुलै २०२५ रोजी सर्व ९ आरोपींच्या जामीन अर्जास मंजुरी दिली.
आरोपींच्या वतीने अॅड. अशोक कवडे यांना अॅड. डी.डी. गंगणे, अॅड. आर.एस. सापते, अॅड. एल.व्ही. गायकवाड, अॅड. आर.आर. लोंढाळ, अॅड. ए.एस. साखरे, अॅड. एस.एस. देशमुख, अॅड. एस.एस. कन्नडकर, अॅड. ए.एस. दोडके यांनी सहकार्य केले.