कडा : कडा शहरातील नागरिकांना रेशनवरील धान्य निकृष्ट दर्जाचे दिले जात आहे.या धान्यात मोठ्या प्रमाणात खडे आणि कचरा आढळला आहे. गरिबांनी ज्वारी खावी की किडे, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
आष्टी तालुक्यातील नियतकालिक धान्य वितरणात मोठी त्रुटी उघड झाली असून नागरिकांना गव्हाऐवजी किडलेली व अळ्या-जाळ्या सोनकिड्यांनी भरलेली ज्वारी वितरीत केल्याचा प्रकार समोर आला आहे. धान्याच्या गोण्यात पांढरा फुफाटा, दुर्गंधीसह अळ्या-जाळ्या सोनकिड्यांची वाढ स्पष्ट दिसून येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
प्रशासनाकडून गहू देण्याचे आदेश असतांना प्रत्यक्षात निष्कृट दर्जाची ज्वारी कशी आली? हा माल कोणत्या गोदामातून पाठविण्यात आला? पुरवठा करणाऱ्या एजन्सीची जवाबदारी कोणाची?यासंदर्भात नागरीकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.या प्रकरणाची तात्काळ चौकशी,निकृष्ट धान्य पुरवठादारांवर कठोर कारवाई करावी व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
निष्कृट दर्जाचे धान्य वाटप करने हा कायद्याने गंभीर गुन्हा असल्याने सार्वजनिक वितरणप्रणाली वरील नागरिकांचा विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे कड्यासह आष्टी तालुक्यात संतापाचे वातावरण असून जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.