

कडा : कडा शहरात अलीकडच्या काही दिवसांत सडकछाप मजनुंचा सुळसुळाट वाढला असून यामुळे शाळा–कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. कॉलेजच्या रस्त्यावर उभे राहून, चौकांत थांबून मुलींना विनाकारण त्रास देणे,टोंन्ट मारणे, चित्रविचित्र हावभाव करणे, टवाळक्या करणे, अशा प्रकारच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. काही पालकांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन लेखी तक्रारी केल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे आम्हाला रोजीरोटी साठी कामावर जावे लागते अन दुसरीकडे दररोज मुलींना सुरक्षितपणे शाळा, कॉलेजला सोडावे लागते, परत आणायला जावे लागते नाहीतर मन शांत राहत नाही. पोलिसांनी कडक कारवाई करून या सडकछाप मजनूंना लगाम घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
“दररोज मुलींना शाळेत–कॉलेजला सोडताना काळजी वाटते. काही वेळा विनाकारण त्रास दिला जातो. यामुळे अभ्यासावर परिणाम होतो. पोलिसांनी कठोर पावले उचलावीत,अशी मागणी पालकांनी केली आहे.
ग्रामस्थांनी विशेषतः दामिनी पथकाची नियुक्ती करण्यावर भर दिला आहे.अशा पथकाच्या गस्तीद्वारे रस्त्यावरची छेडछाड थांबवता येईल आणि विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळेल, असे नागरिकांचे मत आहे.
शहरात पोलिसांनी गस्त वाढवावी, संवेदनशील ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवावा आणि टवाळक्यांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.
“पोलिसांनी दुर्लक्ष न करता दामिनी पथक सक्रिय केल्यास मुली निर्भयपणे शिक्षण घेऊ शकतील असे मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले.