Investigation of Mahadev Munde murder case under the leadership of Kumawat
बीड, पुढारी वृत्तसेवा: परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात तपासाकरिता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार एसआयटी नियुक्त करण्यात आली. या एसआयटीचे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत हे शनिवारी रात्री उशीरा बीडमध्ये दाखल झाले. रविवारी सकाळीच त्यांनी पोलिस अधिक्षक नवनित कावत व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाड यांच्याशी चर्चा करत तपासाची सुत्रे हाती घेतली.
परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची एकवीस महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अद्याप एकही आरोप अटक नाही. गंभीर बाब म्हणजे आतापर्यंत सात ते आठ अधिकारी बदलण्यात आलेले आहेत. दरम्यान, याच प्रश्नावर काही दिवसांपूर्वी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडच्या पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी नियुक्त करण्याबाबतचे निर्देश दिले होते.
त्यानुसार प्रक्रिया पूर्ण झाली असून शनिवारी रात्री पंकज कुमावत हे बीडमध्ये दाखल झाले. रविवारी सकाळी त्यांनी पोलिस अधीक्षक नवनित कावत व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बटेवाड यांची भेट घेत या प्रकरणातील माहिती घेतली. तसेच तपासाला गती दिली आहे.
दरम्यान या एसआयटीमधील दुसरे अधिकारी पोलिस निरीक्षक संतोष साबळे हे जालना येथे असून आज सोमवारी ते बीडमध्ये दाखल होणार आहेत. संतोष साबळे यांनी काही दिवस या प्रकरणाचा तपास केलेला होता. त्यामुळे त्यातील माहितीचा उपयोग यापुढील तपासात होऊ शकणार आहे.
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला एकवीस महिने उलटले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील सर्व पुरावे एकत्रित करणे, त्यातून आरोपी निष्पन्न करण्याचे काम नक्कीच आव्हानात्मक आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आतापर्यंत सात ते आठ अधिकाऱ्यांनी तपास केलेला आहे. त्यांना देखील आरोपीपर्यंत पोहचता आलेले नव्हते. बीड जिल्ह्यात डॅशिंग कामगिरी बजावलेले पंकज कुमावत हे या प्रकरणात कशा पद्धतीने तपास करतात, आणि आरोपींना जेरबंद करण्यात यशस्वी होतात का, याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.