परळी वैजनाथ : सध्या 2025 हे वर्ष संपत आले असून 2026 या नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. या निमित्ताने नवीन वर्षाची भेट- इंडिया पोस्ट अशा पद्धतीचा आशय असलेली एक अपरिचित लिंक विविध सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. याबाबत पडताळणी केली असता सोशल मीडियावर फिरणारी ही लिंक फसवी व दिशाभूल करणारी आहे.त्यामुळे अशी लिंक आपल्या सोशल माध्यमावर आल्यास ती उघडून त्यावरील माहिती देऊ नये अन्यथा आपली फसवणूक होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता
अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाचा विपर्यास करून सोशल मीडियावर अनेक फसव्या योजनांची लिंक टाकून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.मागील अनेक दिवसांपासून फसव्या संकेतस्थळांनी व्हॉट्सअॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सध्या इंडिया पोस्ट नवीन वर्षाची भेट 2026 अशा आशयाची वीस हजार रुपयांच्या भेटवस्तूची आमिषे दाखविणारी फसवी लिंक पाठविली जात असून, त्यामुळे अनेक नागरिकांची दिशाभूल होत आहे.
ही लिंक ओपन करताच अनेकांचे मोबाइल हँग होत आहेत. याशिवाय काही व्यक्तींच्या मोबाइलमधून त्यांचा डेटा चोरीला जात आहे. त्यामुळे त्यांच्या बँक खात्याला धोका होण्याचे संकेत आहेत. सोशल मीडियावर फसव्या लिंक व्हायरल होत आहेत, त्या लिंक अगोदर सुरू करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. नोंदणी झाल्यानंतर दोन ते चार प्रश्नांतून अर्जदाराची मते सोशल मीडियाद्वारे जाणून घेतली जातात. त्यानंतर पाच ग्रुपवर किंवा वीस मित्रांना या योजनांच्या माहितीची लिंक पाठविण्याची अट घातली जाते. मात्र, असे करूनही काही लाभ मिळत नाही. उलट या फसव्या आकर्षणाला व माहितीला नागरिक बळी पडल्यामुळे त्यांचे नुकसान होते.
फसव्या लिंक दिसताच डिलिट करा
सध्या सोशल मीडियावर इंडिया पोस्ट नवीन वर्षाची भेट या नावाने लिंक व्हायरल झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही फसव्या लिंक सुरू न करता थेट डिलिट करून घ्याव्यात आणि अशा फसव्या लिंकपासून सावध असावे, असे आवाहन पोलिसांनीही केले आहे.
सुरक्षिततेसाठी काय करावे?
● अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर कधीही क्लिक करू नका
● वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती कधीही अशा साइटवर भरु नका
● अधिकृत संकेतस्थळे उघडूनच माहिती शोधा (उदा. बँकेचे एक्झिस्टिंग डोमेन)
● संशयास्पद लिंक्स असतील तर ते फॉरवर्ड करू नका
"आजकाल .apk एक्स्टेन्शन नावाच्या फाईल पाठवल्या जात आहेत. त्या फाइल इंस्टॉल करू नये. या फाइल इंस्टॉल करताच क्षणात मोबाइलचा ताबा फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगाराच्या ताब्यात जाऊन बँक खाते रिकामे होते. शिवाय मोबाइलमधील तुमचा खाजगी डेटाही चोरीला जाऊ शकतो. प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरवर खात्रीशीर ॲपअसतात. मात्र, थेट लिंक, टेलिग्राम किवा व्हॉटस्ॲप ग्रुपवर आलेल्या अशा Apk फॉरमॅटमधील फाइल असुरक्षित असतात. पडताळणी न झालेल्या लिंक ओपन करू नये."_- धनंजय ढोणे, ठाणेदार पोलिस स्टेशन, संभाजीनगर परळी वैजनाथ.