फिजियोथेरपी महाविद्यालयाचा प्रवेश प्रक्रियेत समावेश करा file photo
बीड

Beed News : फिजियोथेरपी महाविद्यालयाचा प्रवेश प्रक्रियेत समावेश करा

'गुरुकृपा' च्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

Include the physiotherapy college in the admission process

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : फिजियोथेरपीच्या केंद्रिय परिषदेने नियम बदलल्याचे सांगत राज्यातील फिजियोथेरपीच्या प्रवेश प्रक्रियेतून तब्बल 80 महाविद्यालयांची नावे वगळण्यात आली होती. सीईटी सेलच्या या निर्णयाला माजलगावच्या 'गुरुकृपा' शिक्षण समूहाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यात उच्च न्यायालयाने गुरुकृपासह न्यायालयात याचिका दाखल केलेल्या इतर महाविद्यालयांची नावे तात्काळ प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

राज्यातील फिजियोथेरपी अभ्यासक्रमांच्या मंजुरी आणि प्रवेश क्षमतेचे नियंत्रण यापूर्वी राज्य परिषदेकडून होत होते. मात्र मागील वर्षी फिजियोथेरपीची केंद्रीय परिषद अस्तित्वात आल्यानंतर परिषदेने देशभर एकसमान प्रवेश क्षमतेचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना प्रवेश क्षमता 50 किंवा 100 निश्चित करण्याबाबत विचारणा केली.

महाविद्यालयांनी याबाबत माहिती दिल्यानंतरही सीईटी सेलने राज्यातील 80 फिजिओथेरपी महाविद्यालयांची नावे प्रक्रियेतून वगळली होती. सीईटी सेल आणि विद्यापीठाचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत आपल्या महाविद्यालयाला यापूर्वीच राज्य परिषद आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मान्यता असल्याने प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्याची मागणी करणारी याचिका माजलगावच्या 'गुरुकृपा' समूहाच्या फिजियोथेरपी महाविद्यालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केली होती.

त्यावर न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली. यात न्यायालयाने गुरूकृपासह सर्व न्यायालयात। याचिका केलेल्या इतर महाविद्यालयांची नावे प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता फिजियोथेरपी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुकृपासह इतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी !

राज्यभरातील तब्बल 80 महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात आले होते. या विरोधात गुरुकृपा फिजीओथेरपी महाविद्यालयाने याचिका दाखल केली होती. त्यांच्या समवेत असलेल्या इतर पाच महाविद्यालयांचा आता प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार आहे. तर उर्वरित 74 महाविद्यालयांना देखील याबाबत कोर्टातून आदेश प्राप्त केल्यानंतर प्रवेश प्रक्रियेत समावेशाबाबत कार्यवाही होऊ शकणार आहे. यामुळे फिजीओथेरपी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT