Incident of dumping chemical-laden water in the river area
माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : माजलगाव तालुक्यातील देवळा परिसरात पर्यावरणाला धक्का देणारी गंभीर घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने टँकरच्या माध्यमातून सरस्वती नदी परिसरात केमिकलयुक्त पाणी टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली असून नदीकाठावरील पाणी दूषित झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे परिसरातील विहिरी व बोअरवेलवर परिणाम झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक ग्रामस्थ यांच्या म्हणण्यानुसार, नदीकाठावरील बोअर व विहिरीतील पाण्याचा रंग बदललेला दिसून आला तसेच तीव्र दुर्गंधी पसरली. विशेष म्हणजे काही ठिकाणी विहिरीत मासे व कासव मृत अवस्थेत आढळून आल्याने पाण्यात विषारी रासायनिक घटक मिसळल्याची शक्यता अधिक बळावली आहे.
या घटनेमुळे देवळा व पुनर्वसन वसाहत परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देवळा आणि पुनर्वसन वसाहत या भागांचा भविष्यातील पाणीपुरवठा सरस्वती नदीतील पाणीपुरवठा विहिरीवर अवलंबून राहणार आहे. सध्या या विहिरीचे काम अर्धवट असल्याने पाणीपुरवठा सुरू नसला, तरी भविष्यात अशा प्रकारे केमिकलयुक्त पाणी झिरपल्यास नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, दूषित पाणी शेतकऱ्यांच्या बोअरवेलमध्ये गेल्याची शक्यता असून अशा पाण्याचा फटका पिकांना बसल्यास उत्पादन घट व आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. पाण्याचा रंग व वास बदलल्याने जनावरांनाही ते पाणी देण्यास भीती वाटते, अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी दिली. याशिवाय पात्रुड ते लोणगाव रोडलगत टँकरने केमिकलयुक्त पाणी टाकल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्त्यालगत पसरलेल्या तीव्र दुर्गंधीमुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून नदी व विहिरीतील पाण्याचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, दोषींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी तसेच नागरिकांना स्वच्छ पर्यायी पाणीपुरवठा उपलब्ध प्रशासनाने लक्ष घालावे !
नदीकाठच्या विहिरीतील पाण्याचा रंग अचानक बदलला आणि तीव्र दुर्गंधी येऊ लागली. काही मासे कासव हे मृत अवस्थेत दिसल्याने आम्ही घाबरलो आहोत. हे पाणी पिण्यास अयोग्य वाटते. प्रशासनाने तातडीने नमुने तपासून दोषींवर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया देवळा येथील एका ग्रामस्थाने व्यक्त केली.
करून द्यावा, अशी मागणी देवळा येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास उमरी व देवळा येथील नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. परिसरातील पर्यावरण, जलस्रोत व नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय अत्यंत गंभीर मानला जात असून त्वरित उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.