Beed News : घुले हत्या प्रकरणाशी माझा संबंध नाही : सौरभ सोनवणे file photo
बीड

Beed News : घुले हत्या प्रकरणाशी माझा संबंध नाही : सौरभ सोनवणे

घटनेदिवशी मी आणि माझी गाडी घरीच; कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी

पुढारी वृत्तसेवा

I have no connection to the Ghule murder case: Saurabh Sonawane

पुढारी केज, वृत्तसेवा टाकळी येथील : विलास घुले हत्याप्रकरणात आपले नाव घेतले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सौरभसोनवणे यांनी प्रथमच माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. घटनेच्या दिवशी आपण येडेश्वरी साखर कारखान्यावर आणि त्यानंतर घरीच असल्याचा दावा करत कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

सौरभ सोनवणे म्हणाले की, विलास घुले यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह घटना असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मात्र या गुन्ह्याशी आपला कोणताही संबंध नसताना राजकीय द्वेषातून आपले नाव घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. घटनेच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत आपण येडेश्वरी साखर कारखान्यावर होतो.

त्यानंतर घरी परतलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घराबाहेर पडलो नसल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यातून वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, या गुन्ह्यात आपली थार गाडी वापरण्यात आल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला.

"माझी थार गाडी घटनेच्या दिवशी घराजवळच उभी होती. त्याचेही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले आहे. त्यामुळे माझी गाडी घटनास्थळी होती, हा आरोप निराधार आहे," असे सोनवणे यांनी सांगितले. राजकीय हेतूने आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करत ते म्हणाले, "खासदारांच्या माध्यमातून मी जिल्हाभर कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत असतो.

लोकांशी असलेला संपर्क आणि वाढता जनाधार काहींना खटकत असल्यामुळेच माझे नाव या प्रकरणात जोडले जात आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. "या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात येणार असून यासाठी आपणही आग्रही आहोत असे सांगून "सत्य समोर आले पाहिजे. पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्डसह सर्व तांत्रिक पुराव्यांची तपासणी करावी. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार असून पोलीस प्रशासन सत्य जनतेसमोर आणेल, असा मला विश्वास आहे," असे सौरभ सोनवणे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, घुले हत्याप्रकरणातील तपास सुरू असून या प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT