परळी वैजनाथ : परळी तालुक्यातील डाबी येथे काल दिनांक 13 रोजी सकाळच्या सुमारास शेत घरामध्ये एका गृहिणीचा रक्तरंजित मृतदेह आढळून आला होता. तिच्या मृतदेहावरील शस्त्राच्या घावांमुळे ही हत्याच असल्याचे निदर्शनास येत होते. मात्र याप्रकरणी कोणीही ठामपणे पुढे न आल्याने गुढ वाढले होते. आता या प्रकरणात मयतेच्या मुलाने फिर्याद दिली असून यानुसार मयत महिलेचा नवराच हत्यारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीला परभणी येथून पोलिसांनी अटकही केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, डाबी गावाजवळील आखाड्यावर असलेल्या शेतघरात मयत शोभा मुंडे या आपले पती तुकाराम मुंडे व मुलांसह राहत होत्या. मात्र पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असायचे. या अनुषंगाने यापूर्वीही या महिलेने आपल्या पतविरुद्ध पोलिसात धाव घेतलेली होती. त्यानंतर सामंजस्याने पती-पत्नीतील वाद नातेवाईकांनी मिटवले होते. त्यानंतर ते सुखाने संसार करत होते.
मात्र गेल्या काही महिन्यांत त्यांच्यात पुन्हा वाद सुरु झाले व पुन्हा पहिल्यासारखीच वादावादी सुरू झाले. या वादातूनच रागाच्या भरात आरोपी पती तुकाराम मुंडे याने धारदार सुरा पोटात खूपसून शोभा हिची हत्या केली आणि घरातून निघून गेला. पती गायब असल्याने प्रथमदर्शनी त्याने तिची हत्या केल्याचा कयास बांधला जात होता. या दृष्टीने पोलिसांनी तातडीने शोध घेतला व रात्री उशिरा आरोपीला परभणी येथून अटक केली आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या मुलाने फिर्याद दाखल केली असुन अधिक तपास परळी ग्रामीण पोलीस करीत आहेत.