birth registration issue pudhari photo
बीड

Beed News : अबब... ऐकावे ते नवलच! पाच वर्षे जन्मनोंदीच गायब

वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अक्षम्य निष्काळजीपणा; शेकडो बालकांचे अस्तित्वच शासनाच्या नोंदीत नाही

पुढारी वृत्तसेवा

अविनाश मुजमुले

वडवणी : एखाद्या बालकाचा जन्म म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात. मात्र वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या धक्कादायक निष्काळजीपणामुळे शेकडो बालकांच्या आयुष्याच्या सुरुवातीलाच प्रशासकीय अंधार पसरल्याचे समोर आले आहे. सन 2019 ते 2025 या कालावधीत जन्मलेल्या शेकडो मुला-मुलींच्या जन्मनोंदी आरोग्य केंद्राच्या अभिलेखांमध्ये उपलब्ध असूनही त्या नगरपंचायत प्रशासनाकडे पाठविण्यातच आल्या नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. परिणामी या बालकांची अधिकृत जन्मनोंदच झालेली नसून त्यांना जन्म प्रमाणपत्र पासून वंचित राहावे लागले आहे.

हा प्रकार केवळ हलगर्जीपणा नसून शेकडो बालकांच्या घटनादत्त हक्कांवर गदा आणणारा आणि त्यांच्या भविष्याशी थेट खेळ करणारा अक्षम्य प्रशासकीय गुन्हा असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार एक-दोन महिन्यांचा नाही, तर तब्बल पाच ते सहा वर्षांचा आहे. या काळात जन्मनोंदींचा डाटा नगरपंचायतीकडे गेला नाही, ऑनलाईन नोंदी झाल्या नाहीत, जन्म प्रमाणपत्रे तयार झाली नाहीत; तरीही आरोग्य विभाग, नगरपंचायत, तहसील प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारी यापैकी कोणाच्याही लक्षात ही गंभीर बाब आली नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एखाद्या कार्यालयाकडून एक-दोन नोंदी राहणे ही चूक असू शकते; मात्र शेकडो बालकांच्या जन्मनोंदी वर्षानुवर्षे प्रलंबित राहणे हे संपूर्ण यंत्रणेच्या बेजबाबदारपणाचे जिवंत उदाहरण मानले जात आहे.2019 आणि 2020 मध्ये जन्मलेली अनेक बालके आता शाळेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असताना प्रवेशासाठी आवश्यक असलेले जन्म प्रमाणपत्रच उपलब्ध नसल्याने पालकांची धावपळ सुरू आहे.

जन्म प्रमाणपत्र नसल्याने शालेय प्रवेश, आधार कार्ड, विविध शासकीय योजना, शिष्यवृत्ती, आरोग्य योजनांचा लाभ आणि भविष्यातील अनेक कागदपत्रांच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणाची शिक्षा मात्र निरागस बालकांना आणि त्यांच्या पालकांना भोगावी लागत असल्याचे चित्र आहे.

तब्बल 200 जन्मनोंदी प्रलंबित

या प्रकरणी आरोग्य विभागाने सन 2019 ते 2025 या कालावधीतील सुमारे 200 जन्मनोंदी नोंदविण्यासाठी तहसील प्रशासनाकडे आवश्यक आदेश देण्याची विनंती केल्याचे समोर आले आहे. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने पालकांची चिंता वाढत आहे.

एकीकडे शासन नागरिकांना वेळेत सेवा देण्याचे दावे करत असताना दुसरीकडे जन्मासारख्या मूलभूत आणि अत्यावश्यक नोंदींची अशी अवस्था झाल्याने सरकारी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही केवळ चूक नाही, तर भविष्याशी खेळ

या प्रकरणात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गंभीर निष्काळजीपणा आणि कर्तव्यातील कुचराई स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोप होत आहे. जन्मनोंद ही प्रत्येक नागरिकाच्या अस्तित्वाची पहिली शासकीय नोंद असते. तीच नोंद नसल्यास त्या बालकाला शासनाच्या नजरेत अधिकृत ओळखच मिळत नाही. म्हणूनच या प्रकरणाकडे केवळ प्रशासकीय त्रुटी म्हणून पाहता येणार नाही. हा शेकडो बालकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय भविष्याशी झालेला गंभीर अन्याय असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

या प्रकारासाठी जबाबदार असलेल्या सन 2019 ते 2025 या कालावधीतील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि पर्यवेक्षण यंत्रणेची चौकशी करून त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

जन्मनोंद ही केवळ एक सरकारी नोंद नसून प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याचा पाया असते. वडवणीतील या धक्कादायक प्रकारामुळे शेकडो बालकांच्या शिक्षणाचा, ओळखीचा आणि भविष्यातील हक्कांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सर्व प्रलंबित जन्मनोंदी पूर्ण कराव्यात आणि दोषींना शिक्षा करून नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.

शेकडो बालकांचे भविष्य धोक्यात ः भारत जगताप

याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते तथा रोजगार हमी योजनेचे माजी अध्यक्ष भारत जगताप यांनी संताप व्यक्त केला. लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे दररोज शेकडो पालक चकरा मारत आहेत. आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेकडो बालकांचे भविष्य धोक्यात आले आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. प्रशासनाने तातडीने सर्व जन्मनोंदी पूर्ण करून पालकांना दिलासा द्यावा. अन्यथा सर्व प्रभावित पालक व बालकांना सोबत घेऊन व्यापक जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

119 प्रलंबित, त्यापैकी 70 दाखले वाटप : डॉ. लोमटे

119 प्रलंबित होते. त्यापैकी 70 जन्म दाखला प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. उर्वरित प्रलंबित आहेत. त्यांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांना एक वर्षा पेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर तहसील कार्यालयात मार्फत जन्म दाखला देत येत आहेत. या नवीन वर्षापासून प्रसुती झाल्यानंतर तात्काळ जन्म दाखला देण्यात येत असल्याचे वडवणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शहाजी लोमटे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT