Beed News : बीड जिल्ह्यात अतिवृष्टी : नदी, नाले तुडुंब  File Photo
बीड

Beed News : बीड जिल्ह्यात अतिवृष्टी : नदी, नाले तुडुंब

पिकांचे नुकसान; सकल भागातील शेतांमध्ये साचले पाणी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Heavy rains in Beed district: Rivers, drains overflow

बीड, पुढारी वृत्तसेवा बीड जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावत संततधार कोसळली असून, जिल्ह्यातील तब्बल १७ महसुली मंडळांत अतिवृष्टी नोंदली गेली आहे. सर्वाधिक पाऊस केज तालुक्यात झाल्याने मांजरा धरण तब्बल ९० टक्के भरले असून धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले असून काही भागांतील शेतकऱ्यांना मात्र या पावसाने जीवदान दिले आहे. केजसह पाली, नाळवंडी, चौसाळा, नेकनूर, लिंबागणेश, पाटोदा, थेरला, धोंडराई, तलवाडा, रेवकी, युसूफवडगाव, बनसारोळा, नांदुर घाट, नागापूर, सिरसाळा, तितरवणी आणि ब्रम्हनाथ येळंब या महसुली मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतजमिनीतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पिके पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. जून-जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडले होते. मात्र आता सुरू असलेल्या संततधारेमुळे जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये पाण्याचा मुबलक साठा झाला आहे. दोन मोठ्या प्रकल्पात तब्बल समाधानकारक साठा असून, खरीप हंगामासाठी हा पाऊस वरदान ठरणार आहे.

प्रशासनाचा दौरा; पंचनाम्याची मागणी

जिल्ह्यातील विविध भागांत प्रशासनाचे अधिकारी दौरे करत असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही. मात्र शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता तत्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT