Heavy rain again in Talani Mandal
तळणी, पुढारी वृत्तसेवा : मंठा तालुक्यातील तळणी मंडळात चार दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाच शुक्रवारी पुन्हा जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसामुळे खरीप - पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. चार दिवसांपूर्वी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले नसतानाच शुक्रवारी पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले.
तळणी मंडळात चार दिवसांपूर्वी - पडलेल्या १४७ मि.मी. पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस दररोज हजेरी लावत असतानाच शुक्रवारी पुन्हा जोरदार पाऊस पडला. सततच्या पावसामुळे शेतकरी शेतातील पिकात साचलेले पाणी काढून टाकण्यासाठी धडपडत असला तरी सततच्या पावसामुळे त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसत आहे.
दररोजच्या पावसाला शेतकरी वैतागला आहे. खरीप हंगाम हातातून जाणार असल्याच्या विवंचनेने शेतकरी धास्तावला आहे. तळणी मंडळ हे विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असल्याने विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा अलर्ट दिला तरी त्याचा परिणाम या भागात होतो.
तसेच मराठवाड्यातील जालना जिल्ह्याला अलर्ट दिला तरी या भागात पाऊस पडत असल्याने पावसाला शेतकरी कंटाळले आहेत. सततच्या पावसामुळे खरीप पिके पिवळी पडू लागली आहे. तर पाण्यात असलेली तूर पूर्णपणे उबळली आहे. ज्या शेतकऱ्यांचे थोडेफार पीक वाचले होते त्या पिकांची मुळे सततच्या पावसाने सडत आहे. जेमतेम एक ते दीड महिन्याचे पीक सततच्या पावसामुळे तग धरू शकत नाही. शेतकरी मोठ्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. जमीन खरडून जाणे व त्यातील पीक जाण्याचे दुःख हे शेतकरीच समजू शकता.
ढगफुटीसदृश पावसामुळे चार एकरमधील सोयाबीन पिकासह जमीन खरवडून गेली आहे. आजही शेतात पाणी साचलेले आहे. शासनाने तुटपुंजी मदतीऐवजी ठोस मदत करावी.-नारायण पाटील, शेतकरी
तळणी मंडळातील २० हजार हेक्टरवर पेरणी लायक क्षेत्र आहे त्या पैकी १० हजार हेक्टर वर सोयाबीनची पेरणी आहे. उर्वरित क्षेत्रावर कापूस, मूग, उडीद, तूर व अन्य पिकांचा समावेश आहे. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे तळणी मंडळातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार लोणीकर हे शेतकऱ्यांना लवकर मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करीत आहेत.शरद पाटील, भाजपा उपाध्यक्ष