Gutkha Seized : धारूरमध्ये साडेपाच लाख रुपयांचा गुटखा पकडला Pudhari Photo
बीड

Gutkha Seized : धारूरमध्ये साडेपाच लाख रुपयांचा गुटखा पकडला

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, सुगंधी पान मसाला व सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या गुटखा माफियांवर धारूर पोलिसांची मोठी कारवाई.

पुढारी वृत्तसेवा

Gutkha worth ₹5.5 lakh seized in Dharur

धारूर : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, सुगंधी पान मसाला व सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या गुटखा माफियांवर धारूर पोलिसांनी मोठी कारवाई करत साडेपाच लाख रुपयांच्या गुटख्यासह ३१ लाख ६२ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांनी याची माहिती केज व धारूर पोलिस स्टेशनला देऊन आडस ते धारूर रोडवरील डूबे प्लॉटिंग परिसरात सापळा रचून नाकाबंदी केली. दरम्यान, पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा (एमएच-१४ जीयू-०६९९) ही चारचाकी संशयितरीत्या येताना दिसली.

पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केली असता चालकाने आपले नाव सय्यद कलीम निजाम सय्यद (वय ४२, रा. फुलेनगर, माजलगाव) असे सांगितले. तर वाहनात सोबत असलेल्या व्यक्तीने अब्दुल अहाद जुबेर सिद्दीकी (वय १९, रा. अशोकनगर, माजलगाव) अशी ओळख दिली. पोलिसांनी तात्काळ संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. गुटख्यासह इनोव्हा क्रिस्टा कार किंमत २४ लाख रुपये तसेच अँड्रॉईड मोबाईल फोन किंमत १ लाख ४७हजार रुपये असा एकूण ३१ लाख ६२ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलिस अंमलदार नाना निगुळे यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सय्यद कलीम निजाम सय्यद व अब्दुल अहाद जुबेर सिद्दीकी यांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींमध्ये शुभम कन्नोरेटी, जुबेर एजाज सिद्दीकी, त्रिंबक डुकेर व अशोक संक्राते (सर्व रा. माजलगाव) यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर कारवाई सहायक पोलिस अधीक्षक नवनीत कांवत, उपविभागीय पोलिस अधिकारी अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके, सहायक पोलिस अधीक्षक केज विभाग व्यंकटराम तसेच प्रभारी पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे, जावेद कराडकर, इनामदार, गुंजाळ, विकास चोपणे, काळकुटे, नाना निगुळे तसेच नितीन काळे यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT