गोपीनाथ मुंडे - पंकजा मुंडे 
बीड

Gopinath Munde Jayanti| गोपीनाथ मुंडे एक हळवा बाप :पंकजा मुंडे यांनी सांगितला भावनिक किस्सा !

लेक अन् आठणी: नेता आणि पिता यादृष्टीने पंकजांनी केलं मनमोकळ भाष्य, गोपीनाथ मुंडे यांची जयंती

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ: राजकीय क्षेत्रात गोपीनाथ मुंडे हे नाव एका उंचीवर गेलेलं नाव म्हणून देशभर ओळखलं जातं. मात्र ते किती हळव्या मनाचे आणि संवेदनशील वडील होते याचा एक किस्सा त्यांच्या कन्या व राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः आज गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी सांगितला. हा किस्सा सांगताना पंकजा मुंडे एक लेक म्हणून काहीशा भावनिकही झाल्याचे बघायला मिळाले.

भाजपाचे दिवंगत केंद्रीय मंत्री लोकनेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे गोपीनाथ मुंडे यांची आज 12 डिसेंबर रोजी जयंती साजरी करण्यात आली. एक खंबीर धीरोदात्त नेता अशी ज्यांची राजकीय क्षेत्रात ओळख आहे. असे गोपीनाथ मुंडे हे लेकीसाठी किती हळवे आणि संवेदनशील होते याचा एका नाजूक क्षणातील व्यक्तिगत किस्सा पंकजा मुंडे यांनी सांगितला. पंकजा मुंडे या तेव्हा राजकारणात सक्रिय नव्हत्या. विवाहानंतर नंतर त्या अमेरिकेत राहत होत्या. त्यांच्या बाळंतपणाच्या वेळीचा किस्सा त्यांनी सांगितला. पंकजांना मुलगा झाला त्यावेळी सर्व कुटुंबीय व नातलग त्यांना भेटण्यास गेले. सर्वजण मुलगा झाला या खुशीमध्ये होते. गोपीनाथ मुंडे ही एकच व्यक्ती अशी होती की, त्यांनी बाळ पाहिले आणि पटकन काळजीने माझ्याजवळ येऊन माझ्या डोक्यावर हात ठेवून "बेटा तू बरी आहेस ना", तुला खूप त्रास झाला का? अशा शब्दात माझी काळजी केली. यातून ते किती हळव्या मनाचे आणि संवेदनशील होते हेच दिसून येते. हा किस्सा सांगत असताना लेक म्हणून पंकजा मुंडे काही क्षणासाठी भाऊकही झाल्याचं बघायला मिळाले.

तर मुली फार प्रगल्भ व कर्तृत्ववान घडू शकतील

पंकजा मुंडे यांनी सांगितले की,आम्ही जर झोपलेलो असलो तर आमच्या रूम मध्ये ते हळूच डोकावून बघायचे आणि हळूच दार बंद करायचे. त्यांनी मुली म्हणून आम्हाला जी वागणूक दिली ती वागणूक जर सर्व मुलींना त्यांच्या वडिलांनी दिली तर मुली फार प्रगल्भ व कर्तृत्ववान घडू शकतील असे वाटते. आमच्या घरातलं सगळ्यात लाडकं बाळ असल्यासारखे आमचे बाबा होते.

स्वतःच्याही पलीकडे जाऊन त्यांनी लोकांचा विचार केला

पंकजा मुंडे यांनी सांगितले की, मला खरंच आज त्यांच्याविषयी किती किती आणि काय काय सांगावे यासाठी शब्द सापडत नाहीत. पण दुसऱ्याच्या वेदनेची त्यांना सतत जाणीव असायची. एका अपघातातून ते मरता मरता वाचले. अपघात परळीत झाला होता आणि मुंबईमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. त्या अपघातात उपचारादरम्यान शुद्धित आल्याबरोबर त्यांचा पहिला प्रश्न होता की, जो गाडी समोर आला तो मुलगा कसा आहे? त्यांनी स्वतःच्या वेदना सोडून त्या मुलाविषयी प्रश्न विचारले.अशा स्वतःच्या जीवावर बेतलेल्या वेळीही मुंडे साहेबांना काळजी लोकांची वाटत होती. स्वतःच्याही पलीकडे जाऊन त्यांनी लोकांचा, वंचितांचा नेहमीच विचार केला.

मी फक्त त्यांची मुलगी नाहीये तर त्यांची शिष्या ...

पंकजा मुंडे यांनी सांगितले की, मी फक्त त्यांची मुलगी नाहीये तर त्यांची शिष्य होते ,त्यांची चेली होती, कुटुंबात त्यांची चमची होते. त्यामुळे मी जे शिकले, मुलगी म्हणून तर ते असेलच पण त्यांची शिष्य म्हणूनही शिकले. मला नाही वाटत मरणानंतरही रोज लोकप्रिय होणारे दुसरी कोणी व्यक्ती असू शकेलं. कारण दहा वर्षांमध्ये मी मुंडे साहेबांची मुलगी आहे, म्हणून लोक मला ओळखतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT