Gold prices  file photo
बीड

Gold prices : सोन्याचे भाव गगनाला; बेन्टेक्स दागिन्यांकडे वाढता कल

धारूर : संक्रांतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बेन्टेक्सचीच चमक

पुढारी वृत्तसेवा

Gold prices are soaring; there is a growing trend towards imitation jewelry

धारूर, पुढारी वृत्तसेवा : सोन्याच्या दरांनी गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर सोने गेले आहे. सध्या सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले असून, त्यामुळे पारंपरिक पद्धतीने सोने खरेदी करण्यावर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या आहेत. याचा थेट परिणाम संक्रांतीसारख्या सणासुदीच्या काळात धारूर शहरासह तालुक्यात ग्रामीण भागात दिसून आला आहे.

संक्रांतीनिमित्त महिलांमध्ये दागिन्यांची खरेदी करण्याची परंपरा असली तरी यंदा तोळ्याचा भाव (पावणेदोन लाखाच्या जवळ) वाढलेल्या सोन्याच्या दरांमुळे अनेक महिलांनी बेन्टेक्स (कृत्रिम) दागिन्यांना पसंती दिली. आकर्षक डिझाइन, हलके वजन आणि परवडणारी किंमत यामुळे बेन्टेक्स दागिन्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे की, एवढ्या वाढलेल्या किमतीमुळे सोन्याची खरेदी करणे शक्य राहिले नाही.

यापुढे सोने घेणे जवळजवळ बंदच करावे लागेल, अशी भावना अनेक ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कामगार वर्गासाठी सोने खरेदी करणे अत्यंत कठीण झाले आहे. दरम्यान, हळदी-कुंकू, लग्नसमारंभ, गृहप्रवेश (हाऊसवॉर्मिंग) तसेच इतर कौटुंबिक कार्यक्रमांसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणावर बेन्टेक्स दागिन्यांचा वापर होत आहे.

सोन्याप्रमाणेच दिसणारे पण कमी किमतीतील हे दागिने सर्वसामान्य महिलांना परवडणारे ठरत आहेत. धारूर शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बेन्टेक्स दागिन्यांची दुकाने सुरू झाली असून, या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, यंदा सोन्याच्या दरवाढीचा फायदा बेन्टेक्स दागिन्यांच्या व्यवसायाला झाला असून, विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.

एकीकडे सोन्याचे दर वाढत असताना दुसरीकडे ग्राहकांचा कल कृत्रिम दागिन्यांकडे वळत असल्याचे स्पष्ट होत आहे. भविष्यात सोन्याचे दर असेच वाढत राहिले, तर सर्वसामान्यांच्या दागिन्यांच्या पसंतीत मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे साखळी चोरांची भिती देखील महिलांमध्ये वाढली असून यामुळेच काही ठिकाणी सोन्या ऐवजी बेन्टेक्सच्या दागिन्यांचा वापर केला जात असल्याचे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT