Ghule family stages protest by climbing water tank, demanding justice
केज, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाची अकरा दिवसापूर्वी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सौरभ सोनवणे याला अटक करावी तसेच समाज माध्यमातून होत असलेली घुले कुटुंबाची बदनामी थांबवावी या मागणीसाठी बुधवारी सकाळपासून गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात येत होते. या आंदोलनात विलास घुले यांची पत्नी भाऊ व इतर काही लोक सहभागी झाले होते. अखेर सायंकाळी साडेपाच वाजता या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले हा मित्राला होत असलेली मारहाण थांबवण्यासाठी गेला असता त्याच्यावर चाकू हल्ला करून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी दहा आरोपींना अटक केलेली आहे. रमेश घुले यांनी पुरवणी जवाबांमध्ये सौरभ सोनवणे यांच्यावर देखील आरोप केलेले आहेत त्याला अटक करावी यासह समाज माध्यमातून मुले कुटुंबाची होत असलेली बदनामी थांबवावी यासह इतर काही मागण्यांच्या विषयी घुले कुटुंबाने बुधवारी सकाळपासून गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले होते.
विलास घुले यांच्या पत्नी तसेच रमेश घुले व इतर काही लोक या आंदोलनात सहभागी झाले होते तर गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीच्या परिसरात ही आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाबाबत ची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी देखील उपस्थित झाले होते.
सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास केज पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर यांनी या ठिकाणी दाखल होत मागण्यांचे निवेदन स्वीकारले व वरिष्ठांशी चर्चा करून या मागण्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन
माझ्या भावाचा खून झाला आहे, त्या प्रकरणात पोलिसांकडून योग्य तो तपास केला जात नाही. तर काही लोक या प्रकरणात निव्वळ राजकारण करत आहेत. माझी व कुटुंबाची नाहक बदनामी करत आहेत माझ्यावर चाळीस ते पन्नास गुन्हे दाखल असल्याची चर्चा समाज माध्यमातून केली जात आहे. हे सर्व राजकीय लोक आहेत, माझ्यावर जर एवढे गुन्हे दाखल असले तर पोलिसांनी मला असे मोकळे सोडले असते का? मी माझ्या भावासाठी न्याय मागतोय तेवढा मला द्यावा. मला या प्रकरणात आणखी काही नको, या प्रकरणात ज्या ज्या आरोपीवर आम्ही कारवाईचे मागणी केली आहे त्यांना अटक करावे तसेच समाज माध्यमातून होत असलेली बदनामी थांबवावी या मागणीसाठी आज आंदोलन केले या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचा असल्याचे रमेश घुले यांनी सांगितले.
मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवणार : सपोनि क्षीरसागर
आंदोलकांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्या आम्ही वरिष्ठांना कळवणार आहोत. या प्रकरणातील जो तपास सुरू आहे तो विशेष तपास पथकाकडून रमेश घुले यांना कळवला आहे. आज ज्या मागण्या आहेत त्या देखील आम्ही वरिष्ठांना कळवून त्याविषयी कारवाई करणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश क्षीरसागर यांनी सांगितले.