गझलकार सतीश दराडे यांचे निधन Pudhari Photo
बीड

...संपली वारी ! सतीश दराडे कायमचे विठोबाच्या दारी!

पुढारी वृत्तसेवा
बीड : बालाजी तोंडे

कधी विनेतूनी आलो,

कधी टाळातूनी आलो...

तुकोबांची व्यथा घेऊन,

तळागाळातूनी आलो..!

विठोबा, संपली वारी..

निघू का रे घरी आता...

तुला ठावुक आहे,

मी मुला- बाळातुनी आलो...!!

कविता आणि गझलेच्या दुनियेत किलर दराडे नावाने प्रसिद्ध असलेले शब्दप्रभू सतीश दराडे यांचे रविवारी (दि.8) दु:खद निधन झाले. बालाघाटाच्या डोंगर रांगेतील अतिशय दुर्गम अशा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या टोकवाडी (ता. वडवणी जि. बीड) येथे जन्मलेल्या सतीष दराडे यांचे चार गझल संग्रह प्रकाशीत आहेत. त्यांची प्रत्येक गझल काळजाला भिडणारी, र्‍हदयाचा ठाव घेणारी, वास्तवाचे भान देणारी आणि परखड सत्य मांडणारी आहे. (Satish Darade)

'हे' चार गझल संग्रह प्रकाशित | Satish Darade

अगदी तरूण वयात एकापेक्षा एक सरस रचना लिहिणारे सतीश दराडे मराठी गझलकारांच्या माळेचे मुकूटमणी बनले होते. गझलेच्या दुनियेतील हा बाप माणूस वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी आयुष्याची वारी संपवून कायमचा विठोबाच्या चरणी लीन झाला. स. बा. दराडे या नावाने गझल लिहीणार्‍या सतीश दराडे यांचे "विठोबा संपली वारी, माझ्या आषाढाचे अंश, कैदखान्याच्या छतावर, श्‍वासांच्या समिधा" हे चार गझल संग्रह प्रकाशित आहेत. या चारही पुस्तकात त्यांनी एकाहुन एक सरस अशा गझल लिहिल्या आहेत.

सतीश दराडेंच्या गझलेत वेदना, वास्तव, मानवी जीवनाचे पैलूही

नाही पुन्हा बिलगली, आत्म्यास मोहमाया..

मी एकटाच रडलो, काळीज नितळ कराया !

मातीतूनी उगवलो, मातीमध्ये मिसळलो..

माझे मरून काही गेले न फार वाया!!

अतिशय प्रतिभाशाली गझलकार असलेल्या सतीश दराडे यांच्या प्रत्येक गझलेत वेदना, वास्तव, मानवी जिवणाचे पैलू दिसून येतात...

Satish Darade ; ZP चे विद्यार्थीप्रिय शिक्षक

रात्र काळोखी, तरीही धग उशाला

कोण गेले, ठेवुनी तगमग उशाला!

सूर्यअस्ताच्या अगोदर व्याप उरका,

रात्रभर ठेऊ नका दगदग उशाला..

काळ घेतो खूप सत्वाच्या परीक्षा,

पात्रता येऊन बसते मग उशाला..

जन्मभर भेटायलाही वेळ नव्हता,

शेवटी जमले किती जिवलग उशाला

चेह-यावर थेंबही नाही, सकाळी

घेतला होतास रात्री, ढग उशाला..!!

जेवढे गहन तेवढेच बोलके शब्द... र्‍हदय पिळवटुन टाकणार्‍या गझला सतीश दराडे यांनी लिहील्या. अकोला जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेले दराडे हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. सर्व शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकार्‍यांचे लाडके होते. पालकांचे आवडते होते.

सतीश दराडेंच्या गझलातून काळजाचा ठाव

लग्न लावले तुझे नि दूर जाहलो,

तू जिती असूनही विधूर जाहलो...

वेदनेस दोन चार आसवे दिली,

वाजवी दरात दानशूर जाहलो...

आसवे खरी तुझी दिसू न द्यायची,

मी चुलीतला म्हणून धूर जाहलो...

सावलीत भेटलीस रात्र नेसुनी,

सावळा असून मी टिपूर जाहलो...

द्यायचा बळी म्हणून कौल लावला,

देव पावल्यावरी फितूर जाहलो...

वर्ज्य वाटतो तरी निमूट गा मला,

मी तुझ्या समेवरील सूर जाहलो...!

सतीश दराडे हे गझलेतून वेदना तर मांडायचेच मात्र त्यांचे शब्द थेट काळजाचा ठाव घेत असत. कितीतरी संमेलने, गझल मुशायरे त्यांनी गाजवले. बीडच्या मातीत जन्मलेल्या या दराडे यांनी नाशिक येथील साहित्य संमेलन गाजवले. हृदयाला भिडणार्‍या रचनांमधून त्यांनी महाराष्ट्रात लाखो नवे गझलप्रेमी तयार केले. लाखो रसिक श्रोत्यांचे प्रेमही त्यांना मिळाले.

गझलेतील ओळ एका पुस्तकापेक्षा मोठी होती

रानात श्वापदांच्या, आयुष्य काढल्यावर..

किंचाळतो म्हणे, तो माणूस पाहिल्यावर!

तुजला सवाल करतो, साधाच ब्रह्मचार्या..

स्वप्नामधे कितीदा, चढलास बोहल्यावर!!

माझ्याच सारखा, मज दिसतो समोर वैरी..

माझे असेच होते, पाण्यात पाहिल्यावर!

आता तरी व्यथांनो, तुमच्या कुळात घ्या ना..

उरलाच प्रश्न कोठे, गणगोत मानल्यावर!!

गळत्या घरास येते, शाकारता नव्याने..

सांगा कसे करावे, आभाळ फाटल्यावर..!

काढून बांगड्या तू, हळुवार फेक माती..

होईल प्रेत जागे, चाहूल लागल्यावर!!

माझ्या तिच्या मिठीचा, इतिहास काय सांगू..

संकोच आड आला, एकांत लाभल्यावर!

सतीश दराडे यांच्या गझलेत तळागाळातील माणसांच्या व्यथा, त्यांचे जगणे, त्यांना येणार्‍या अनंत अडचणी दिसतात. यामुळेच ते गझलेतून गळत्या घरास येत, शाकारता नव्याने... सांगा कसे करावे, आभाळ फाटल्यावर... सतीश दराडे यांच्या या चार ओळीवर हजारो पुस्तके ओवाळून टाकवी वाटतात. कारण त्यांच्या गझलेतील प्रत्येक ओळ एका पुस्तकांपेक्षा नक्कीच मोठी वाटते.

शब्दांचे जादूगर, गझलेच्या दुनियेतील बाप माणूस

एका नदीमुळे, जो डोंगर खचून गेला..

त्याचाच बांध रचला, दुसरे धरण कराया !

अंती तिच्या विधीला, ना कावळा मिळाला..

जी बोलवीत होती, चिमण्या दळण कराया !!

सोडून औत जेव्हा, दिंडीत बाप जातो..

शेतात माय असते, नामस्मरण कराया !

जी अंगठी कधी, ना बोटात ठेवली मी..

राखेत तीच उरली, स्पष्टीकरण कराया...!!

काय ते शब्द, सतीश दराडे हे शब्दांचे जादूगर होते. गझलेच्या दुनियेतील बाप माणूस होते. एवढ्या तरूण वयात त्यांचे जाणे लाखो चाहत्यांच्या काळजाला पिळवटून टाकणारे आहे.

सतीश गझलेच्या रुपात ध्रुवतारा बनून राहतील

परम मित्र असलेल्या पसायदान सेवा प्रकल्पाचे गोवर्धन दराडे यांनी समाज माध्यमात आपल्या भावना व्यक्त करताना 'सत्या तू सरणात जळत होतास अन् चटके मला बसत होते' अशा पोटात गलबलून येणार्‍या भावना व्यक्त केल्या. अगदी तरूण वयात गेलेल्या सतीश दराडे यांना आणखी दहा- वीस वर्षाचे आयुष्य लाभायला हवे होते. असो, आज सतीश दराडे आपल्यात नसले तरी त्यांच्या गझलेच्या माध्यमातून अढळ असा ध्रुवतारा बनून ते कायम आपल्यासोबत असणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT