गेवराई : गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील अंबिका नगर परिसरात राहणारा रामेश्वर (उर्फ गोरख) मोहन शिंगणे (वय 25) हा तरुण काही कारणास्तव रागाच्या भरात घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाला होता. अनेक दिवसांच्या शोधानंतर अखेर आज त्याचा मृतदेह अंबिका नगर परिसरातील एका विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दि. 31 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी रामेश्वर शिंगणे हा आपल्या आईला सांगून घराबाहेर पडला होता. मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही. नातेवाईक व ग्रामस्थांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली; मात्र तो कुठेही आढळून आला नाही. अखेर काल तलवाडा पोलीस ठाण्यात त्याच्या आईच्या तक्रारीवरून रामेश्वर बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.
आज सकाळच्या सुमारास अंबिका नगर भागातील एका विहिरीत एका तरुणाचा मृतदेह तरंगताना नागरिकांच्या निदर्शनास आला. ही माहिती तात्काळ तलवाडा पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास अन्नादास, बीट अंमलदार अंजन गडदे व पोलीस हवालदार नारायण काकडे घटनास्थळी दाखल झाले.
विहिरीतील पाण्यात बराच काळ मृतदेह राहिल्याने शरीर पूर्णतः छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळून आले. त्यामुळे पंचनामा करून जागीच शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेहाची ओळख रामेश्वर (उर्फ गोरख) शिंगणे अशी पटली. या घटनेमुळे तलवाडा व अंबिका नगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तरुणाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा तपास तलवाडा पोलीस करीत असून, मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.