Bullock killed by lightning Gevrai Beed
गेवराई : तालुक्यातील खेर्डा वाडी येथे अवकाळी पावसासह झालेल्या विजेच्या तडाख्यात शेतकरी मनोहर भारती यांचा बैल दगावल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे आधीच पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यावर दुहेरी संकट ओढवले आहे.
माहितीनुसार, दुपारच्या उकाड्यानंतर अचानक वातावरणात बदल होऊन ढग दाटून आले आणि गडगडाटासह पावसाने जोर धरला. याच दरम्यान शेतात बांधलेल्या बैलावर वीज कोसळून तो जागीच ठार झाला. क्षणात घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्याचा कष्टाचा आधार हिरावला गेला.
मनोहर भारती यांच्यासाठी हा बैल केवळ जनावर नव्हता, तर त्यांच्या शेतीकामाचा मुख्य आधार होता. शेतीतील प्रत्येक काम या बैलाच्या मदतीने होत होते. मात्र, एका क्षणात त्यांचा हा जिवलग सोबती कायमचा निघून गेला.
आधीच अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले असताना आता बैल गमावल्याने भारती कुटुंबीयांवर मोठे आर्थिक व मानसिक संकट कोसळले आहे. “पिकं गेली, आता बैलही गेला… आम्ही जगायचं तरी कसं?” अशी हळहळ त्यांनी व्यक्त केली.
घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्याला धीर दिला. दरम्यान, या घटनेचा तात्काळ पंचनामा करून शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.