टाकरवण : गेवराई तालुक्यातील तपेनीमगाव येथील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपशाच्या केणीवर कामासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची रविवारी घडली. सोमवारी सकाळी या तरुणाचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध वाळू उपशाच्या प्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सतीश किसन भोंगदळ (वय ३५, रा. टाकरवन, ता. माजलगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारच्या सुमारास सतीश भोंगदळ हा तपेनीमगाव येथील गोदावरी नदीपात्रात वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या केणीवर कामासाठी गेला होता. दोरखंडाला केंग बांधण्यासाठी तो नदीपात्रात उतरला असताना अचानक तो बेपत्ता झाला. ही माहिती परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी नदीकाठाकडे धाव घेतली. नदीकाठावर सतीश याचे कपडे व मोबाईल आढळून आल्याने तो पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यानंतर तलवाडा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सोमवारी सकाळपासून गोदावरी नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात आली. स्थानिक मच्छीमार, ग्रामस्थ, अग्निशमन दलाचे पथक तसेच प्रशासनाच्या मदतीने शोधकार्य सुरू होते.
अखेर सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सतीश भोंगदळ याचा मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
या घटनेमुळे टाकरवन परिसरात शोककळा पसरली असून अवैध वाळू उपशामुळे अनेकांचे जीव धोक्यात येत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.