Pune News : खेळताना काळाची झडप! पाझर तलावात बुडून सख्ख्या जुळ्या बहीण-भावाचा मृत्यू, ओतूरवर शोककळा

साबळे कुटुंबावर नियतीचा क्रूर घाला
Pune News : खेळताना काळाची झडप! पाझर तलावात बुडून सख्ख्या जुळ्या बहीण-भावाचा मृत्यू, ओतूरवर शोककळा
Published on
Updated on

ओतूर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मंगळवारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. ओतूर-तळेरान परिसरातील पुष्पावती नदीवरील पाझर तलावात बुडून नऊ वर्षांच्या सख्ख्या जुळ्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्रावणी रामदास साबळे आणि गणेश रामदास साबळे (वय ९) अशी मृत चिमुकल्यांची नावे असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणी आणि गणेश हे मूळचे तळेरान (वसईवाडी) येथील रहिवासी होते. शिक्षणासाठी ते आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे राहत होते. सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे ते आपल्या गावी आले होते. मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजता गावातील इतर मुलांसोबत ते पुष्पावती नदीवरील पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेले होते.

तलावाच्या काठावर खेळत असताना दोघांचाही पाय घसरून ते खोल पाण्यात गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. सोबत असलेल्या मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर दोघांनाही पाण्यातून बाहेर काढून तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

या घटनेबाबत माहिती देताना सरपंच गोविंद साबळे म्हणाले, “दोन्ही भावंडे अत्यंत गुणी होती. सुट्टीसाठी गावी आले असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. या घटनेमुळे साबळे कुटुंबावर आभाळ कोसळले असून संपूर्ण गाव शोकाकुल झाले आहे.”

एकाच वेळी घरातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने वसईवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, उन्हाळ्याच्या दिवसांत मुले नदी, नाले व तलाव परिसरात जात असल्याने पालकांनी विशेष दक्षता घ्यावी, तसेच मुलांना एकटे जलाशयाजवळ पाठवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस करत आहेत.

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये जलाशयांजवळ वाढणारी मुलांची गर्दी लक्षात घेता, सुरक्षिततेचे उपाय काटेकोरपणे राबविण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news