अक्षय दिनेश हातागळे आणि सुनील मदन चव्हाण pudhari photo
बीड

Beed Accident : गेवराई-बीड मार्गावर अपघात

दोघे ठार,चार जण गंभीर जखमी; मध्यरात्री घडलेली घटना

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : गेवराई-बीड रोडवरील मोंढा नाका परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुलाजवळ घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अक्षय दिनेश हातागळे (वय 19, रा. अचानक नगर, गेवराई) आणि सुनील मदन चव्हाण (वय 19, रा. दामू नाईक तांडा, पाचेगाव) अशी मृत तरुणांची नावे आहेत. गेवराई शहरातील अचानक नगर येथील अक्षय दिनेश हातागळे, अक्षय अशोक धुताडमल आणि कार्तिक बाबासाहेब धुताडमल हे तिघे एका दुचाकीवरून बसस्थानकाच्या दिशेने जात होते.

याचवेळी बसस्थानकाकडून पाचेगावच्या दिशेने सुनील मदन चव्हाण, सचिन राजाभाऊ चव्हाण आणि सद्गुरू बाळासाहेब चव्हाण हे तिघे दुसर्‍या दुचाकीवरून जात होते. दरम्यान, मोंढा नाका परिसरातील पुलाजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या भीषण अपघातात अक्षय हातागळे आणि सुनील चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बीड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, दोन्ही मृत तरुणांचे शवविच्छेदन गेवराई उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या घटनेचा पंचनामा पोलीस कर्मचारी प्रकाश गव्हाणे यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT