'GEN Z' Banner : बीडमध्ये 'GEN Z' बॅनरची चर्चा file photo
बीड

'GEN Z' Banner : बीडमध्ये 'GEN Z' बॅनरची चर्चा

तरुणाईला नेमका काय संदेश? लावणारा अद्याप गूढ

पुढारी वृत्तसेवा

'GEN Z' banner creates a buzz in Beed

शशी केवडकर

बीड : बीड शहरात बुधवारी दिवसभर एका वेगळ्याच आशयाच्या बॅनरची जोरदार चर्चा रंगली. "Nation First | राष्ट्र प्रथम" या मथळ्याखाली लावण्यात आलेल्या या बॅनरमध्ये विद्यार्थी आणि भारतीय जवान यांचे प्रतीकात्मक चित्र वापरत "मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे", "मी जवानांचा सन्मान करतो", "मी GEN Z आहे. मी दोघांच्याही बाजूने आहे" असा संदेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा बॅनर नेमका कोणी लावला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून पोलिसांनाही त्याचा उलगडा झालेला नाही. त्यामुळे या बॅनरमागचा हेतू काय, याचीच चर्चा शहरभर रंगली आहे.

बॅनरमध्ये GEN Z अर्थात नव्या पिढीचा उल्लेख करताना, विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांना पाठिंबा देतानाच देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांचा सन्मानही तितकाच महत्त्वाचा असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न दिसून येतो. त्यामुळे अनेकांनी या संदेशाचे स्वागत केले असले, तरी काहींनी यामागील उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शहरातील प्रमुख चौकांमध्ये आणि सोशल मीडियावर या बॅनरचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. "नेमके कोणत्या संघटनेने किंवा व्यक्तीने हा बॅनर लावला?", "यामागे कोणाचा राजकीय अथवा सामाजिक अजेंडा आहे का?", अशा चर्चानाही उधाण आले आहे. काही नागरिकांनी हा देशभक्तीचा सकारात्मक संदेश असल्याचे मत व्यक्त केले, तर काहींनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाशी संबंधित घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा संदेश तरुणांमध्ये संभ्रम निर्माण करू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, या बॅनरवर कोणत्याही संस्थेचे, संघटनेचे किंवा व्यक्तीचे नाव स्पष्टपणे नमूद नसल्याने त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पोलिसांकडेही यासंदर्भात ठोस माहिती नसल्याचे समजते. एकूणच, विद्यार्थ्यांचा प्रश्न, देशभक्ती, भारतीय जवानांचा सन्मान आणि नव्या पिढीची भूमिका या सर्व मुद्द्यांना एकत्र जोडणाऱ्या या बॅनरने शहरात चर्चेचा विषय निर्माण केला असून, त्यामागील उद्देश आणि बॅनर लावणाऱ्याची ओळख उघड होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

बॅनरच्या शेवटी "माझा संकल्प - मी भारतीय जवानांचा अपमान करणाऱ्या घोषणांना साथ देणार नाही" असा ठळक संदेश देण्यात आला आहे. अलीकडील काही आंदोलनांमध्ये जवानांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह घोषणांवरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर लावण्यात आल्याची चर्चा नागरि-कांमध्ये आहे. त्यामुळे हा केवळ सामाजिक संदेश आहे की त्यामागे राजकीय भूमिका आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT