Fund of Rs 4 crores approved for Swarati College
अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा :
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई येथे सांडपाणी व अपशिष्ट प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी शासनाकडून तब्बल ४ कोटी ७ लाख ८३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामागे केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित आहे.
रुग्णालयामध्ये रोज निर्माण होणाऱ्या सांडपाणी व कचऱ्यामुळे परिसरावर होणारा पर्यावरणीय परिणाम लक्षात घेता या प्रकल्पाची तीव्र गरज होती.
शासनाच्या प्रशासकीय मान्यतेनंतर आता या ठिकाणी आधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि अपशिष्ट व्यवस्थापन प्रणाली उभारण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे द्रव अपशिष्ट निर्जंतुक करण्याची प्रक्रिया अधिक वैज्ञानिक आणि सुरक्षित होणार आहे.
अंबाजोगाईतील या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ बीडच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येतात. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सांडपाणी व कचऱ्याचे प्रमाणही झपाट्याने वाढले असून, या दोन्ही समस्यांवर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक उपाय म्हणून हा प्रकल्प प्रभावी ठरणार आहे. यामुळे रुग्णालयाचा परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही बनणार आहे. या योजनेसाठी मंजूर निधी व त्यामागचा सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेता, ही योजना वैद्यकीय शिक्षण संस्थांसाठी आदर्श ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे.
या महत्त्वपूर्ण विषयाची दखल घेऊन निर्णय घेतल्याबद्दल आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व पर्यावरणमंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.