Fraud of ₹77 Lakhs Committed by Using Substandard Materials During Warehouse Construction
बीड, पुढारी वृत्तसेवा : वेअर हाऊस उभारणीसाठी करारामध्ये ठरल्या प्रमाणे साहित्य न वापरता निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणाऱ्या संभाजीनगर येथील रुपम पीईबी कंपनीच्या मालकांवर पेठबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमधील व्यावसायिकाची तब्बल ७७ लाख रुपयांची फसवणूक या प्रकरणात झाली असून याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
बीड ते पिंपळनेर रोडवर दयानंद गायकवाड यांनी वेअर हाऊस उभारणीचे काम हाती घेतले आहे. यासाठी त्यांनी संभाजीनगर येथील कर्नावट नामक व्यवसायिकाशी करार केला होता. करारामध्ये ठरल्याप्रमाणे गायकवाड यांनी कर्नावट यांना ७७लाख ५० हजार रुपये अदा केले आहेत. वेअर हाऊस उभारणीच्या करारामध्ये ब्रँडेड कंपनीचे मटेरियल वापरण्याबाबत निश्चित करण्यात आले होते.
परंतु या कर्नावट बंधुंनी कराराचा भंग करत लोकल कंपनीचे मटेरियल वापरले, तसेच काम देखील अर्धवट ठेवले आहे. याबाबत गायकवाड यांनी जाव विचारल्यानंतरही उर्वरित कामाच्या पूर्ततेबाबत व दर्जाबाबत ठोस उत्तर कर्नावट यांनी दिले नाही. यामुळे गायकवाड यांनी दोन महिन्यांपूर्वी पेठबीड पोलिसात तक्रार दिली होती.
त्यावर आता ९ मे रोजी दयानंद गायकवाड यांच्या फिर्यादीवरून महावीर संतोषकुमार कर्नावट, आयुष संतोषकुमार कर्नावट या बंधूंविरोधात ७७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गु.र.नं. १३२/ २०२६ कलम ३१८ (२), ३१८ (३), ३१८ (४) अन्वये पेठबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील आमदाराचा दबाव?
बीडमधील व्यावसायिक गायकवाड यांची तब्बल ७७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी पेठबीड पोलिस ठाणे गाठत दोन महिन्यांपूर्वी तक्रार दिली होती. परंतु प्रकरण दिवाणी असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या प्रश्नावर गायकवाड यांनी पाठपुरावा सुरु ठेवत वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत आपली कैफियत मांडली, तेव्हा कुठे हा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, कर्नावट बंधु हे संभाजीनगर जिल्ह्यातील एका आमदाराचे नातेवाईक आहेत, त्यामुळेच गुन्हा दाखल केला नव्हता अशी देखील आता चर्चा होऊ लागली आहे.