Fourth list for farm loan waivers announced in Beed district
बीड, पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत बीड जिल्ह्यातील कर्जमुक्तीस पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी गुरुवार, 22 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या चौथ्या यादीत जिल्ह्यातील 4 हजार 791 शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जाचा समावेश करण्यात आला असून, ऐन सणासुदीच्या काळात या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या 3145 आणि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 1646 शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जाचा समावेश आहे. या लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित ग्रामपंचायती, सेवा सहकारी संस्था आणि बँकांच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ही योजना जाहीर झाल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने बीड जिल्ह्यातील एकूण 2 लाख 4 हजार 61 थकीत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाल्याबाबतची यादी प्रसिद्ध केली आहे.
यापैकी आतापर्यंत 1 लाख 58 हजार 598 शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे, तर अद्याप 45 हजार 463 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. पहिली व दूसरी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या आधार प्रमाणीकरणानुसार महाराष्ट्र शासनाने बीड जिल्ह्यासाठी एकूण 918.56 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी राष्ट्रीयकृत बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या थकीत 1 लाख 4 हजार 624 कर्जदारांच्या खात्यात 885.07 कोटी रुपये, तर बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 6254 थकीत कर्जदारांच्या खात्यात 33.49 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेली ही चौथी यादी संपूर्ण कर्जमुक्तीची असून, या यादीतील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा पूर्ण लाभ दिला जात आहे. विशेष म्हणजे, या यादीमध्ये एकापेक्षा जास्त बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची रक्कम 31 मार्च 2026 रोजीची ग्राह्य धरण्यात आली असून, 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत.
तसेच, या यादीतील राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांशी संबंधित काही शेतकऱ्यांची 31 मार्च 2026 रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असली तरी, शासनाच्या हेअर कट धोरणानुसार ही सर्व कर्जे निरंक करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज थकबाकीची खातरजमा करून नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे.
ज्या लाभार्थ्यांचे वय जास्त आहे, ज्यांच्या बोटांचे ठसे उमटत नाहीत किंवा जे लाभार्थी मयत झाले आहेत, अशा शेतकऱ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी शासनाने 19 ऑगस्ट 2026 रोजी विशेष मानक कार्यप्रणाली निर्गमित केली आहे. शासनाने प्रसिद्ध केलेली ही चौथी यादी अंतिम नसून, ज्या पात्र शेतकऱ्यांची नावे पहिल्या चार याद्यांमध्ये आलेली नाहीत, त्यांची नावे पुढील प्रसिद्ध होणाऱ्या यादीमध्ये येऊ शकतात.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आहेत, त्यांनी स्वतःचे आधार कार्ड आणि बँक पासबुक सोबत घेऊन आपले सरकार सेवा केंद्रावर जावे व यादीतील विशिष्ट क्रमांक देऊन विनाशुल्क ई-केवायसी पूर्ण करून घ्यावे. प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम थेट त्यांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाणार आहे.
नवीन पीककर्ज वाटपाचे आदेश
ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली आहे, त्यांना त्वरित नवीन पीक कर्ज वाटप करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला स्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आधार प्रमाणीकरण शिल्लक असलेल्या उर्वरित 45 हजार 463 शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सतीश तोटावार यांनी केले आहे.