Fire at a 'General Stores' in Gevrai City Due to Short Circuit; Losses Amount to Lakhs
गेवराई, पुढारी वृत्तसेवा
शहरातील बौद्ध विहाराजवळ असलेल्या पांडुरंग (पांडु) लाड यांच्या गायत्री जनरल स्टोअर्स या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील विविध जनरल माल, भेटवस्तू व इतर साहित्य जळून खाक झाले.
बौद्ध विहार परिसरातील गायत्री जनरल स्टोअर्समध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. सुरुवातीला धूर निघू लागल्याने परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानंतर नागरिकांनी तात्काळ धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केल्याने दुकानातील मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून गेले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर आग नियंत्रणात आली; मात्र तोपर्यंत दुकानातील बहुतेक माल जळून खाक झाला होता. या घटनेत अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानाचे मोठे नुकसान झाल्याने व्यापाऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. संबंधित यंत्रणेकडून पंचनामा करून नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू होते.