Fight for your rights, don't take extreme steps like ending your life Pankaja Munde
बीड, पुढारी वृत्तसेवा : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील भरत कराड या तरुणाने ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे अत्यंत व्यथित झाल्या आहेत. कोणताही समाज असो, प्रश्न कितीही कठीण असो, पण जीवन संपविणे हा उपाय कधीच ठरू शकत नाही. हक्कासाठी लढा जरूर द्या; पण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे कळकळीचे आवाहन त्यांनी सर्व समाजातील तरुणांना केले आहे.
घटनेवर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, भरत कराडच्या आत्महत्येच्या बातमीने मन विषण्ण झाले. अशा घटना मन पिळवटून टाकतात. संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे, पण आत्महत्या हा कधीच पर्याय नसतो. कुणासमोर झुकायचं नाही, हे आपल्याला लोकनेते गोपीनाथराव मुंडेंकडून शिकायला मिळालं आहे. त्यांच्या संघर्षशील वृत्तीचे संस्कार आपल्यावर आहेत.
त्यामुळे कुठलीही परिस्थिती असो, धैर्याने सामोरे जा. त्या पुढे म्हणाल्या, सामाजिक लढाया लढल्या जातात, कुणी जिंकतं, कुणी हरतं, कुणी फायदा घेतं, तर कुणी गैरफायदा घेतं. पण या सगळ्यात स्वतःचं मन मजबूत ठेवणं आवश्यक आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या कुटुंबाचा, लेकराबाळांचा, आपल्या स्वप्नांचा विचार केला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत कच खाऊ नका, संघर्ष करा.
मंत्री पंकजा मुंडे यांच्या या संदेशात आईची माया, नेत्याचं कर्तव्य आणि समाजाप्रती असलेली कळकळ स्पष्ट दिसून आली. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्मातील, सर्व स्तरांतील तरुणांना हक्कासाठी लढा देतानाच जिवाला तिलांजली देऊ नये, असं ठाम आवाहन केलं आहे.